अमेरिका-पाक संबंध घसरणीला
By admin | Published: May 14, 2016 03:09 AM2016-05-14T03:09:23+5:302016-05-14T03:09:23+5:30
पाकिस्तानला आठ एफ-१६ विमानांची विक्री काँग्रेसने रोखल्यानंतर निर्माण झालेल्या वादाने पाक-अमेरिका यांच्या संबंधावर परिणाम झाला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानला आठ एफ-१६ विमानांची विक्री काँग्रेसने रोखल्यानंतर निर्माण झालेल्या वादाने पाक-अमेरिका यांच्या संबंधावर परिणाम झाला आहे. विदेशविषयक बाबींचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी हे वक्तव्य केले आहे.
अजीज यांनी उभय देशांतील संबंधात ‘घसरण’ झाल्याचे सिनेटसमोर कबूल केले. ते म्हणाले की, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या तीन महिन्यांपासून दडपणाखाली असून, संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकला एफ-१६ विमाने सवलतीत हवी आहेत. पण या विमानांवरील प्रस्तावित सबसिडी परत घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पूर्ण किंमत देऊनच ती विमाने खरेदी करावी लागतील.
अजीज यांनी तीन वेळा ‘भारतीय फॅक्टर’चा उल्लेख केला. ते म्हणाले की, ही विमाने पाकला मिळू नयेत, म्हणून भारतीय लॉबी प्रयत्न करीत आहे. पण आम्ही भारतीय आक्षेप ठोसपणे फेटाळून लावले आहेत. पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचा वापर पाकच्या विरोधात भारत करीत आहे. अमेरिकेतील भारतीय लॉबी अतिशय आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे.