चीननं टॉप गियर टाकला! ड्रॅगनकडून २०३० चं टार्गेट सेट; तब्बल १ हजार अण्वस्त्रांचं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:12 AM2021-11-04T11:12:05+5:302021-11-04T11:12:24+5:30
पेंटागॉनच्या अहवालानं वाढवली चिंता; अण्वस्त्र निर्मितीसाठी चीननं जोर लावला
बीजिंग: चीनकडून सातत्यानं अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली जात आहे. २०३० पर्यंत ड्रॅगनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या हजाराच्या घरात जाईल, असा अंदाज पेंटागॉननं बांधला आहे. चीननं सैन्याच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. चीननं अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करण्यासाठी टॉप गियर टाकला आहे. चीनकडून होणारी अण्वस्त्र वाढ संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी आहे.
दशकाच्या अखेरपर्यंत चीनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या ४०० च्या आसपास असेल असा अंदाज पेंटागॉननं आधीच्या अहवालात व्यक्त केला होता. मात्र आता पेंटागॉननं हाच आकडा हजारच्या घरात जाईल असा अंदाज बांधला आहे. सध्या अमेरिकेकडे ३ हजार ७५० अण्वस्त्रं आहेत. यामध्ये वाढ करण्याचा अमेरिकेचा सध्या तरी कोणताही विचार नाही.
पुढील दशकाच्या अखेरपर्यंत अण्वस्त्रांचं आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याचं लक्ष्य पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनानं (पीआरसी) ठेवलं आहे. जमीन, समुद्र आणि हवेत डागता येणारी अण्वस्त्रं तयार करणारे प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी पीआरसीकडून मोठी गुंतवणूक सुरू आहे. अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेले मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठीही चीननं कंबर कसली आहे.
चीननं किमान तीन आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र भंडारांची निर्मिती सुरू केली असल्याचं पेंटागॉनचा अहवाल सांगतो. चीननं अण्वस्त्रं निर्मितीला गती दिसली तरीही चीनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या अमेरिका आणि रशियापेक्षा कमी आहे.