‘शक्तिशाली परमेश्वरच मला हरवू शकतो, मी पुन्हा येईन’; बायडेन यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:54 AM2024-07-07T08:54:39+5:302024-07-07T08:54:50+5:30
गेल्या आठवड्यापासून, बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची अटकळ बांधली जात होती.
वॉशिंग्टन डी. सी. (अमेरिका) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांनी शुक्रवारी ठामपणे विश्वास दर्शवत समर्थकांना सांगितले की, ते डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आहेत, ते रिंगणात आहेत आणि तेच पुन्हा निवडणूकही जिंकतील. गेल्या आठवड्यापासून, बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची अटकळ बांधली जात होती.
गेल्या आठवड्यात अटलांटा राज्यात त्यांच्या खराब कामगिरीनंतर पक्षातदेखील त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव वाढत होता. शुक्रवारी बायडेन यांनी एका प्रचारसभेत बोलताना अशा सर्व शंका दूर करण्याचा यानिमित्ताने प्रयत्न केला.
अटलांटामध्ये माझी कामगिरी चांगली होती असे मी म्हणू शकत नाही. पण तेव्हापासून बरेच अंदाज बांधले जात आहेत. बायडेन काय करणार आहेत? ते टिकतील का, की ते शर्यतीतून बाहेर पडतील? मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की, मी शर्यतीत कायम आहे आणि पुन्हा जिंकणारदेखील आहे. प्रचारसभेनंतर एका मुलाखतीत बोलताना बायडेन म्हणाले, आता केवळ सर्वशक्तिशाली परमेश्वरच आपल्याला राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हरवू शकतो.