मोठी बातमी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 10:39 AM2020-10-02T10:39:32+5:302020-10-02T10:40:33+5:30
Donald Trump Corona Positive: डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. होप हिक्स, कोणतीही सुटी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
वॉशिंग्टन : सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल प्रतिक्षेत होता. ट्रम्प यांनीच याची माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. होप हिक्स, कोणतीही सुटी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक असून माझी पत्नी मेलानिया आणि मी आमच्या चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. यादरम्यान आम्ही क्वारंटाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असे ट्रम्प त्यांनी म्हटले होते. आता कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच अनेकदा त्यांनी जाहीररित्या मास्क घालणार नाही असे म्हटले होते.
US President Donald Trump and First Lady Melania Trump test positive for #COVID19. pic.twitter.com/tsLjbMsmoz
— ANI (@ANI) October 2, 2020
बायडन यांच्यावर टीका
दोन्ही नेत्यांच्या डिबेटवेळी ट्रम्प म्हणाले की, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते. यावर बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाहीय, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या पंक्तीत बसवत त्या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला आहे.
भारतावर आरोप
महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतात जेव्हा लॉकडाऊनची गरज होती तेव्हा ट्रम्प यांच्यासाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे आरोप होत आहेत. अशावेळी ट्रम्प यांनी भारतावरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.