अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर, सेऊलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 01:04 PM2017-11-07T13:04:58+5:302017-11-07T14:13:20+5:30
आशिया पॅसिफिक दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला कसं उत्तर द्यायचं यावर 'तोडगा काढू' असे सूचक ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.
सेऊल- दोन आठवड्यांच्या आशिया पॅसिफिक दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला कसं उत्तर द्यायचं यावर 'तोडगा काढू' असे सूचक ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये अणूकार्यक्रमामुळे तणाव वाढत आहे. त्यातच किम जोंग उनने केलेल्या अणू चाचण्यांमुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये थेट वादग्रस्त विधानांची देवणघेवाण होऊन हे वातावरण अधिकच तापले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाचे नागरिक नेहमीच युद्धाच्या तोंडावर उभे असतात.
Getting ready to leave for South Korea and meetings with President Moon, a fine gentleman. We will figure it all out!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 6, 2017
जपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांची काल भेट घेतल्यानंतर डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर निघाले आणि त्यांनी आपण दक्षिण कोरियाला जात असून अध्यक्ष मून यांच्याबरोबर बैठकीत चर्चा करणार असल्याचे ट्वीट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेद्वारे पॅसिफिक सागरात लष्करी सराव, निधीची मदत अशा वाटाघाटी, घटना घडतच आहेत. अमेरिकेची युद्धनौका यूएसएस रोनल्ड रेगनने गेले तीन दिवस जपानच्या समुद्रामध्ये जपानी विनाशिका आणि भारतीय युद्धनौकांच्या बरोबर सराव केला आहे. यामुळे जपान आणि कोरिया यांच्यामधील भागामध्ये अधिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प हे 12 दिवसांच्या आशिया दौऱ्यावर असून त्यांनी त्यातील सर्वात पहिली भेट रविवारी जपानला दिली. त्यानंतर आता ते दक्षिण कोरियाला गेले आहेत. जपानमध्ये शिंजो अबे यांच्याबरोबर त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. जपानमध्ये त्यांनी माशांना खाद्य घालताना अख्खा डबाच पाण्यात उलटा केल्यावर ट्वीटरवर त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली. ट्रम्प यांच्या या भेटीकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या दौऱ्यामधून आशियातील विविध देशांना नक्की काय मिळणार याची चर्चा विविध माध्यमांमध्ये सुरु आहे.
#USA🇺🇸 #Japan🇯🇵 pic.twitter.com/EvxFqAVnFS
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 6, 2017