डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव!
By देवेश फडके | Updated: January 4, 2021 12:04 IST2021-01-04T12:01:38+5:302021-01-04T12:04:28+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव!
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या क्लिपनंतर अमेरिकेतील राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या व्हायरल झालेल्या क्लिपची तुलना थेट वॉटरगेट प्रकरणाशी केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाच्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियातील निवडणूक अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून निवडणूक निकालात 'बदल' करण्यासाठी दबाव टाकला होता, असे समोर आल्याचे म्हटले जात आहे.
President Trump on call with Georgia Secretary of State Brad Raffensperger: "All I want to do is this. I just want to find 11,780 votes, which is one more than we have." https://t.co/XtxBCtWvDK#TrumpTapespic.twitter.com/IfObvWlXgS
— The Hill (@thehill) January 4, 2021
जॉर्जियाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि रिपब्लिकन नेता ब्रॅड रफेनस्पेर्गर यांना दूरध्वनी केला होता. मला केवळ ११ हजार ७८० मतांचा शोध घ्यायचा आहे. ही मते आपल्याकडे आहेत. कदाचित यापेक्षाही अधिक असतील. मात्र, हे काम आपण करावे, अशी माझी इच्छा आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले होते.
यानंतर ब्रॅड रफेनस्पेर्गर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले की, जॉर्जियामधील निवडणूक निकाल योग्य आहे. आता यावर काही केले जाऊ शकत नाही. ब्रॅड रफेनस्पेर्गर यांच्या उत्तरानंतर ट्रम्प यांनी धमकावल्याची भाषा करत, मी सांगितलेले काम करण्यात अपयश आल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्ड झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा जॉर्जिया प्रांतता विजय झाला होता. तसेच जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले.