अवैधरीत्या नव्हे, तर योग्यतेच्या आधारावर अमेरिकेत या, ट्रम्प यांचा स्थलांतरित प्रवाशांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 03:45 PM2018-10-14T15:45:12+5:302018-10-14T15:45:22+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणा-या प्रवाशांना कडक इशारा दिला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणा-या प्रवाशांना कडक इशारा दिला आहे. योग्यतेच्या आधारावरच अमेरिकेत या, अवैधरीत्या येणा-या प्रवाशांनी अमेरिकेत प्रवेश करू नका, असं ट्रम्प म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी सीमेच्या मुद्द्यावर अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे लोकांनी आमच्या देशात वैधरीत्या प्रवेश करावा, त्यासाठी अवैध पद्धतीचा वापर करू नका, लोकांनी इथे योग्यतेच्या आधारावर यावं, अशी माझी इच्छा आहे.
वास्तव्यासाठी परदेशातून येणा-या प्रवाशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. योग्यतेच्या आधारवरच प्रवाशांना अमेरिकेत प्रवेश मिळेल. माझ्या या भूमिकेमुळे भारतातल्या व्यावसायिकांना मदत मिळू शकते. मला वाटतं अनेक जणांनी अमेरिकेत यावं, आमच्या देशातही चांगल्या कार कंपन्या येणार आहेत. गेल्या 35 वर्षांत असं झालं नाही. आमच्याकडे फॉक्सकॉनसारख्या कंपन्या आहेत. जी मोठ्या प्रमाणात कारचे प्लांट लावू इच्छिते. आम्हाला वाटतं लोकांनी अमेरिकेत यावं, पण ते फक्त योग्यतेच्या आधारावरच यावं, आमची मदत करू इच्छिणा-या लोकांनीच अमेरिकेत यावं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.