मर्यादा ओलांडल्यास तुमच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून फेकू; डोनाल्ड ट्रम्प यांची तुर्कीला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 04:32 PM2019-10-08T16:32:28+5:302019-10-08T16:41:33+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्थानला धमकी दिली आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली आहे. तुर्कस्ताननं मर्यादा ओलांडल्यास त्यांची पूर्ण अर्थव्यवस्थाच मुळापासून उखडून टाकणार, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेनं तुर्कीच्या सीमेवरच्या अमेरिकन सैनिकांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
तुर्कस्ताननं स्वतःच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी स्वतःच मार्ग काढावा. मी याधीही सांगितलं होतं आणि आताही पुन्हा सांगतो आहे, तुर्कीनं एका सीमेच्या पलिकडे जाऊन काही केल्यास तुर्कीच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला बरबाद करून टाकू, असंही ट्रम्प यांनी धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच तुर्कस्ताननं स्वतःच कुर्दाचा सामना करून त्यातून मार्ग काढावा.
तुर्की, युरोप, सीरिया, इराण, इराक आणि रशियानं कुर्दांचा काय तो निर्णय घ्यावा. आपापल्या क्षेत्रात सापडलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांसंबंधी तुम्हीच निर्णय घ्यावा. आता या अर्थहीन युद्धातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. सैनिकांना पुन्हा घरी परत बोलवायचा आहे. आम्ही लोकांच्या हितासाठी आतापर्यंत लढाई लढत होतो. आम्ही फक्त जिंकण्यासाधीच लढतो, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.As I have stated strongly before, and just to reiterate, if Turkey does anything that I, in my great and unmatched wisdom, consider to be off limits, I will totally destroy and obliterate the Economy of Turkey (I’ve done before!). They must, with Europe and others, watch over...
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 7, 2019
कुर्दांवर हल्ला करणार तुर्की?
व्हाइट हाऊसनं जारी केलेल्या एका विधानानुसार, तुर्कस्तान उत्तर सीरियामध्ये कारवाईसाठी पुढे सरसावणार आहे. परंतु या अभियानात तुर्कस्तानबरोबर अमेरिकेचं सैन्य नसेल. तुर्कस्तानच्या सीमेवरून अमेरिकेनं सैन्य हटवलेलं आहे. आता तिकडे फक्त कुर्दच राहिले आहेत. जे इसिसच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेला सहकार्य करत होते. आता तुर्की सेना कुर्दच्या सैन्यावर हल्ला करणार असून, अमेरिकाही यामध्ये पडणार नाही. तर दुसरीकडे अमेरिकेनं तुर्कस्तानमधून सैन्य हटवल्यामुळे ट्रम्प यांच्यावरही टीका केली जात आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निक्की हेलीनंही या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. अमेरिकेनं आपल्या वाट्याचं काम केलं आहे आणि बाकीचं इतरांनी पाहावं, असं म्हणून ट्रम्प यांनी हात झटकले आहेत.