अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:29 AM2020-02-11T08:29:23+5:302020-02-11T08:40:49+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. व्हाइट हाऊसनं याची माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशा आशयाचं ट्विट व्हाइट हाऊसनं केलं आहे. अमेरिका आणि भारताची सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ट्रम्प हा दौरा करत आहेत. तसेच भारतीय लोकांशी मजबूत आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही या दौऱ्याचा उद्देश आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं 16 जानेवारीला सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित दौऱ्यासाठी भारत आणि अमेरिका मुत्सद्दी माध्यमातून संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीत सांगितलं होतं की, मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी ट्रम्प यांना भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं होतं. दोन्ही देश याबाबत एकमेकांच्या संपर्कात आहेत. जेव्हा आम्हाला खात्रीशीर माहिती मिळेल, तेव्हाच ती सार्वजनिक केली जाईल, असंही रवीशकुमारांनी सांगितलं होतं.
President @realDonaldTrump & @FLOTUS will travel to India from February 24-25 to visit Prime Minister @narendramodi!
— The White House (@WhiteHouse) February 10, 2020
The trip will further strengthen the U.S.-India strategic partnership & highlight the strong & enduring bonds between the American & Indian people. 🇺🇸 🇮🇳
गेल्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प मोदींबरोबर मंचावर दिसले होते, त्यावेळी मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही भारतात आमंत्रित केलं होतं. त्यावेळीच मोदी म्हणाले होते, ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या स्वप्नांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीसुद्धा भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं.