अमेरिका निवडणूक २०२४: कमला हॅरिस यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:04 PM2024-08-12T12:04:54+5:302024-08-12T12:06:05+5:30
सुरुवातीला अशा सर्वेक्षणांत डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर आघाडी घेतली होती
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे तीन महिने बाकी असताना, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये त्यांचे रिपब्लिकन समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्वेक्षणात आघाडी घेतली आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि सिएना कॉलेजने ५ ऑगस्ट ते ९ ऑगस्टदरम्यान केलेल्या अलीकडील सर्वेक्षणानुसार, हॅरिस तीन राज्यांमधील १९७३ मतदारांमध्ये ५० ते ४६ टक्के पाठिंब्यासह ट्रम्प यांच्यापेक्षा ४ टक्क्यांनी आघाडीवर आहेत.
सुरुवातीला अशा सर्वेक्षणांत डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर आघाडी घेतली होती; परंतु आता हॅरिस बाजी मारताना दिसत आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांनी या महत्त्वाच्या राज्यांमध्ये पुढाकार घेतल्याने निवडणुकीपूर्वी बरेच काही बदलू शकते.