'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 14:21 IST2024-04-27T14:19:50+5:302024-04-27T14:21:35+5:30
Joe Biden, depression suicide thoughts: अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांच्या मनात का आला आत्महत्येच्या विचार? नंतर कोणी वळवलं मन... वाचा सविस्तर

'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
Joe Biden reveals about depression suicide thoughts: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे उमेदवारांबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील डिप्रेशन संदर्भातील प्रसंग सांगितला. तसेच, त्यावेळी ते एका पुलावरून उडी मारून जीव देण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कधी आलं होतं डिप्रेशन?
"पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. माझी पहिली पत्नी, नीलिया हंटरच्या मृत्यूनंतर मी डेलावेअर मेमोरियल ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार केला होता. आत्महत्या करण्याच्या कल्पनेबद्दल मी मोकळेपणाने बोलू शकतो. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी स्कॉचची (दारूची) बाटली घेऊन बसायचो आणि विचार करत राहायचो. आत्महत्या करण्यासाठी मानसिकदृष्ट्या बिकट परिस्थितीत असावे लागते. डिप्रेशनमध्ये असताना जर तुम्ही डोंगराच्या माथ्यावर गेला असाल तर तुम्हाला असे वाटते की तुम्ही येथे पुन्हा कधीच येऊ शकणार नाही. मी पण स्कॉच पिऊन नशेत गेलो होतो आणि मला वाटले होते की मी डेलावेअर मेमोरियल ब्रिजवर जाऊन उडी मारेन, पण मी तसे केले नाही," असा किस्सा त्यांनी सांगितले.
मुलांच्या विचाराने रोखलं...
"मला दोन मुले आहेत, ज्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. हे सत्य जेव्हा माझ्यासमोर आले, तेव्हा मी डेलावेअर मेमोरियल ब्रिजवरून उडी मारण्याचा विचार डोक्यातून काढला. माझ्या मुलांच्या विचाराने मला आत्महत्या करण्यापासून रोखले," असे बायडन म्हणाले.