"हमास सैतानांची संघटना, ते अल कायदापेक्षाही वाईट"; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे संतप्त उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 06:07 PM2023-10-14T18:07:02+5:302023-10-14T18:09:14+5:30
"दिवसेंदिवस हे चित्र भयानक होतंय, इस्रायलला हवी मदत अमेरिका करेल"
Israel Hamas War, US president Joe Biden: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू झालं आहे. या युद्धात बऱ्याच निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. इस्रायलचे अनेक नागरिक गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेने ओलीस ठेवले आहेत. तसेच, इस्रायलने प्रत्युत्तरात सुरू केलेले बॉम्बहल्ले बंद न केल्यास नागरिकांना ठार करण्याची धमकीही हमासने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आधीच इस्रायलला पाठिंबा दर्शवला होता. त्यातच आता, हमास ही संघटना ओसामा बिन लादेनच्या अल कायदा संघटनेपेक्षाही वाईट असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. फिलाडेल्फियातील 'हायड्रोजन हब्स' येथे त्यांना भाषणात हे विधान केले.
बायडेन म्हणाले, "इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल जितकी जास्त माहिती मिळते तितके ते भयावह आणि भयानक दिसते. २७ अमेरिकी नागरिकांसह हजारांहून अधिक निष्पाप लोक मारले गेले आहेत. हमास हे सैतान आहेत. अल कायदाही त्यांच्या तुलनेत ठीक आहे. हे लोक वाईट आहेत. मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की, अमेरिका इस्रायलच्या सोबत आहे."
"इस्रायलकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. आम्ही खात्रीशीर पद्धतीने सांगतो की इस्रायलकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. गाझामधील मानवतावादी संकटाला तोंड देण्यासही अमेरिका प्राधान्य देत आहे. आपल्या सूचनेनुसार अमेरिकेची टीम या प्रदेशात काम करत आहे आणि इजिप्त, जॉर्डन आणि इतर अरब देशांच्या सरकारांशी आणि इस्रायलला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांशी थेट संवाद साधत आहे," असेही बायडेन म्हणाले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी यात पॅलेस्टाईनचा संबंध नसल्याचा पुनरूच्चार केला. "पॅलेस्टाईनच्या महत्त्वपूर्ण लोकसंख्येचा हमास आणि त्याच्या हल्ल्यांशी काहीही संबंध नाही या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आज मी एका तासाहून अधिक काळ झूम कॉलवर त्या सर्व अमेरिकन कुटुंबांशी बोललो ज्यांचे कुटुंबातील सदस्य बेपत्ता आहेत. ते ज्या दुःखातून जात आहेत, त्यांची मुले, मुली, पती, पत्नी आणि मुले कोणत्या स्थितीत आहेत याची कल्पनाही करता येणार नाही. हे त्रासदायक आहे. मी त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे," अशा शब्दात बायडेन यांनी अमेरिका इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील चांगल्या लोकांच्या पाठिशी उभी असल्याचे स्पष्ट केले.