Joe Biden : "आपण एकमेकांचे शत्रू नाही, तर..."; ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बायडेन यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:32 AM2024-07-15T09:32:11+5:302024-07-15T09:38:31+5:30
Joe Biden And Donald Trump : ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर या संपूर्ण प्रकारावर भाष्य केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर या संपूर्ण प्रकारावर भाष्य केलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात याआधी इतका हिंसाचार पाहिला गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हिंसाचाराच्या मार्गावर जायचं नाही असं म्हटलं आहे. राष्ट्राला संबोधित करताना, बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकन संसदेवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. आता थोडा संयम बाळगण्याची वेळ आली आहे असं म्हटलं.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी पेनसिल्व्हेनिया येथे पोहोचले होते. याच दरम्यान एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. ट्रम्प यांच्या कानाला गोळी लागून गेली, त्यामुळे रक्तस्त्राव झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी २० वर्षीय हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रुक्सला जागीच ठार केलं.
राष्ट्राला संबोधित करताना बायडेन म्हणाले की, "राजकारणातील गरजेबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. मला आठवण करून द्यायची आहे की, जेव्हा आपण असहमत असतो तेव्हा आपण एकमेकांचे शत्रू नसतो, तर शेजारी असतो. आपण मित्र आहोत, आपण सहकारी आहोत, आपण नागरिक आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजं आपल्याला एकत्र उभं राहायला हवं."
"आज मला जे आपल्याला माहीत आहे त्याबद्दलच बोलायचं आहे. एका माजी राष्ट्राध्यक्षांना गोळी मारण्यात आली आणि एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला, जो फक्त आपल्या आवडत्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी स्वातंत्र्याचा अधिकार वापरत होता. आपण हे करू शकत नाही. अमेरिकेत आपल्याला अशा मार्गावर जायचं नाही. हिंसा हे कधीच याचं उत्तर असू शकत नाही."
अलीकडच्या काळात अमेरिकेत झालेल्या हिंसाचाराचाही बायडेन यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, "दोन्ही पक्षांच्या काँग्रेस सदस्यांना लक्ष्य करून गोळीबाराचे प्रकरण असो. ६ जानेवारीला कॅपिटल हिलवर हिंसक जमावाने केलेल्या हल्ल्याचे प्रकरण असो. माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या पतीवरील हल्ला असो किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी देण्याचं प्रकरण असो, विद्यमान राज्यपालांविरुद्ध अपहरणाचा कट असो किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न असो. अशा प्रकारच्या हिंसाचाराला किंवा कोणत्याही हिंसेला अमेरिकेत जागा नाही."
"मी आपल्या लोकशाहीसाठी ठामपणे बोलेन. आपल्या संविधानासाठी आणि कायद्याच्या राज्यासाठी उभे राहा. आपल्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची हिंसा होता कामा नये. आपण असहमत असतो. आपण उमेदवाराचं चारित्र्य, रेकॉर्ड, मुद्दे, अजेंडा आणि दृष्टिकोन याची तुलना करतो. पण आपण सर्वजण हे बॅलेट बॉक्समध्ये मत टाकून करतो, गोळीबाराने नाही. अमेरिकेला बदलण्याची शक्ती नेहमी लोकांच्या हातात असली पाहिजे, हत्याऱ्यांच्या हातात नाही" असंही ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे.