ज्यो बायडन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, जी-२० संमेलनासाठी भारतात येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:25 AM2023-09-06T08:25:19+5:302023-09-06T08:26:18+5:30
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ज्यो बायडन यांच्या भेटीला दुजोरा दिला आहे.
भारतात नवी दिल्ली येथे आयोजित जी-२० शिखर संमेलनासाठी जगभरातील दिग्गज नेते येणार आहेत. या जी-२० संमेलनात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन भारतात येणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ज्यो बायडन यांच्या भेटीची पुष्टी झाली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ज्यो बायडन यांच्या भेटीला दुजोरा दिला आहे.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, जी-२० संमेलनात सहभागी होण्यासाठी ज्यो बायडन गुरुवारी भारताला भेट देणार आहेत. यावेळी ज्यो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक असणार आहेत. ज्यो बायडन शनिवार आणि रविवारी जी-२० शिखर संमेलनाच्या अधिकृत सत्राला उपस्थित राहतील. दरम्यान, ज्यो बायडन यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे सोमवारी रात्री ज्यो बायडन यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांच्या या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी सांगितले की, त्यांच्या रिपोर्टमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. दरम्यान, ज्यो बायडन यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडन यांची सोमवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र वर्तमानकाळात त्यांच्यामध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत.
दरम्यान, ६ तारखेला ज्यो बायडन भारतात पोहोचणार आहेत.त्यांच्या येण्याआधी हवाई सुरक्षेसोबतच जमिनीच्या सुरक्षेसाठीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ज्यो बायडन एअरफोर्स-वनमधून भारतात येणार आहेत. यासाठी तयारी करण्यात आली आहे, हे एअर फोर्स-वन ४ हजार स्क्वेअर फूट आहे आणि ते तीन मजली एअरक्राफ्ट आहे. त्याच्या सेन्सर्सवर सतत लक्ष ठेवले जाते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष येणार नाहीत
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-२० शिखर संमेलनाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र जी-२० मध्येच नाही तर भविष्यात अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचांवरून शी जिनपिंग गायब होणार आहेत. सर्वत्र शी जिनपिंग आपल्या जागी त्यांचा एक प्रतिनिधी पाठवत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत शी जिनपिंग यांना मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचांवर का तोंड लपवावे लागत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.