अध्यक्षपदाची निवडणूक : अमेरिकेतील फक्त २२ टक्के भारतीयच देणार ट्रम्प यांना मते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:35 AM2020-10-31T04:35:11+5:302020-10-31T07:28:53+5:30
Donald Trump News : भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत. मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशीयांंपैकी ४८ टक्के जणांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे. मात्र, त्यातील २२ टक्के लोकच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अमेरिकी मोदी’ असे संबोधल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार आहेत.
अमेरिकेत एका पाहणीत हा निष्कर्ष आला आहे. त्या देशातील ३२ टक्के भारतीय वंशीयांचा मोदी यांना विरोध आहे, तर २० टक्के जणांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला. निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडन यांना ७२ टक्के भारतीय वंशीय मतदान करणार आहेत.
भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत. मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे. लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण १ टक्का आहे. त्यातही मतदार असलेले १ टक्क्याहून कमी आहेत.
यंदा निकालाची प्रक्रिया लांबणार; अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन विराजमान होणार की, अमेरिकी मतदार पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच पसंती देणार, हे समजण्यासाठी यंदा मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे; परंतु यंदा मतमोजणी लांबणार असून कदाचित दोन आठवड्यांपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे. अध्यक्षीय निवडणूक असली तरी कोरोनाने विश्रांती घेतली आहे, असे अजिबात नाही. उलटपक्षी अमेरिकेत पुन्हा नव्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
कोरोना कहराच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आपापल्या नागरिकांना पोस्टाने मतपत्रिका (मेल इन बॅॅलेट्स) पाठविण्याचे आवाहन केले आहे किंवा मग विहित मुदतीच्या आधी मतदान (अर्ली वोटिंग) करण्याचा आग्रह केला आहे. त्यानुसार आतापर्यंत साडेसहा कोटी मतदारांनी वरील पद्धतीने मतदान केले आहे. त्याला काही कारणे आहेत. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे काही राज्यांमध्ये अर्ली वोटिंग किंवा मेल-इन बॅलेट्स यांची मोजणी आधी होऊ शकते. तर काही राज्ये मतमोजणीची प्रक्रिया प्रत्यक्ष मतदानानंतरच करावी, असा आग्रह धरू शकतात. त्यामुळे मतमोजणीसाठी वेळ लागू शकतो.
निकाल कधी लागेल?
तूर्तास याचे ठोस उत्तर देणे कठीण असले तरी साधारणत: दोन आठवड्यांपर्यंत मतमोजणी चालू शकेल आणि त्यानंतरच विजयी उमेदवाराची घोषणा होईल. अध्यक्षपदी निवड झालेल्या उमेदवाराचा शपथविधी नव्या वर्षात २० जानेवारी रोजी होईल.