"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 02:20 PM2024-07-06T14:20:21+5:302024-07-06T14:21:19+5:30

US Presidential Election: नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे जो बायडन (Joe Biden) यांच्यावर वरचढ ठरले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी होत आहे.

US Presidential Election: "Only God can take me out of the presidential race," Joe Biden said   | "राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  

"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  

अमेरिकेमध्ये या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी चुरस दिसून येत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय वादविवादामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्यावर वरचढ ठरले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जो बायडन यांनी पहिल्या अध्यक्षीय वादविवादात आपली कामगिरी चांगली होऊ शकली नसल्याचं मान्य केलं आहे. या चर्चेपूर्वी मी थकलो होतो, आणि आजरी होतो, असे त्यांनी सांगितले. मात्र अध्यक्षीय निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचेही बायडन यांनी ठामपणे सांगितले. केवळ सर्वशक्तिशाली देवच मला ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधून बाहेर काढू शकतो, असा दावा बायडन यांनी केला.

अटलांटा येते २७ जून रोजी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या अध्यक्षीय वादविवादामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे जो बायडन यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना अध्यक्षीय निवडणुकीतून बाजूला होण्याचं आवाहन केलं आहे.

पहिल्या अध्यक्षीय वादविवाद चर्चेमध्ये झालेल्या खराब कामगिरीबाबत जो बायडन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो एक वाईट दिवस होता. कुठल्याही गंभीर स्थितीचे संकेत मिळत नव्हते. मात्र मी थकलो होतो. मी तयारी करताना आपल्या मनाचं ऐकलं नाही, ती केवळ एक वाईट रात्र होती. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या कुठल्याही नेत्याने मला अध्यक्षीय निवडणुकीमधून बाजूला होण्यास सांगितलेलं नाही. जेव्हा सर्वशक्तिमान देवच मला असं करण्यास सांगेल, तेव्हाच मी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेईन.  

Web Title: US Presidential Election: "Only God can take me out of the presidential race," Joe Biden said  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.