कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अमेरिकेकडून ९०० अब्ज डॉलरचे पॅकेज, बेरोजगारांना  मिळणार भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 01:31 AM2020-12-23T01:31:51+5:302020-12-23T01:32:27+5:30

CoronaVirus News in US : लोकप्रतिनिधीगृह असलेल्या ‘काँग्रेस’मध्ये ३५९ विरुद्ध ५३ मतांनी तर वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये ९१ विरुद्ध ७ मतांनी यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

US to provide 900 billion package to fight Corona, unemployment benefits | कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अमेरिकेकडून ९०० अब्ज डॉलरचे पॅकेज, बेरोजगारांना  मिळणार भत्ता

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अमेरिकेकडून ९०० अब्ज डॉलरचे पॅकेज, बेरोजगारांना  मिळणार भत्ता

googlenewsNext

न्यूयॉर्क : कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकी संसदेने ९०० अब्ज डॉलरच्या आपत्कालीन पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेजमधून गरजू नागरिकांसह उद्योग व व्यवसायांना आर्थिक मदत आणि बेरोजगारांना केंद्रीय बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. 
सलग दोन दिवस चर्चा केल्यानंतर अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पॅकेजला मंजुरी दिली. लोकप्रतिनिधीगृह असलेल्या ‘काँग्रेस’मध्ये ३५९ विरुद्ध ५३ मतांनी तर वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये ९१ विरुद्ध ७ मतांनी यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले. हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. 
या पॅकेज अन्वये, छोट्या व्यावसायिकांना २८४ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर कायम ठेवण्यासाठी या पॅकेजची त्यांना मदत होईल. याशिवाय गरजू अमेरिकी नागरिकांना १६६ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य केले जाईल. यातून गरजू नागरिकांना एकरकमी ६०० डॉलर मिळतील. घरभाडे भरू न शकणाऱ्या नागरिकांना या विधेयकांतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी २५ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. भाडे थकले म्हणून घरमालक भाडेकरूंना घराबाहेर काढू शकणार नाहीत.
बेरोजगारांना देण्यात येत असलेल्या ६०० डॉलरच्या केंद्रीय मासिक बेरोजगारी लाभाची मुदत डिसेंबर अखेरीस संपणार आहे. हा भत्ता कमी करून ३०० डॉलर करण्यात आला आहे; मात्र त्याची मुदत मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. 
अमेरिकी काँग्रेस सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी सांगितले की, ‘अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांना कोरोना विषाणूला चिरडण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी उचलण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे.’
सिनेटचे वरिष्ठ सदस्य एम. मॅकॉवेल यांनी सांगितले की, हे पॅकेज अमेरिकी नागरिकांना संकटातून सावरण्यासाठी फायदेशीर ठरेल. अमेरिकेतील छोटे व्यावसायिक, बेरोजगार व गरजू नागरिक यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा होती. त्यांना या पॅकेजने मोठा दिलासा मिळेल.

बाजारपेठेला चालना देण्याचा प्रयत्न
या पॅकेजच्या माध्यमातून ग्राहकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेन अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर खुंटला आहे. व्यापार-उदिम ठप्प असून, बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून, मृत्यूचा आकडाही मोठा आहे. काेरोनाच्या संकटकाळातच अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. जो बायडेन यांनी ही निवडणूक जिंकली असून, पुढील महिन्यात २० जानेवारी रोजी ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

Web Title: US to provide 900 billion package to fight Corona, unemployment benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.