कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:46 PM2023-10-05T15:46:15+5:302023-10-05T15:46:31+5:30
निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वितुष्ट आले आहे. भारतानेकॅनडाच्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. तर भारतीय कंपन्यांनी तेथील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कॅनडा गुढग्यावर यायचे बाकी राहिला असून तिकडे अमेरिकेतही मोठी खळबळ उडाली आहे.
निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते. यावर भारताने त्यांच्याकडे पुरावे मागितले होते. परंतू, ट्रुडो ते देऊ शकले नाहीत. या साऱ्या प्रकरणावरून बायडेन प्रशासन दबाव वाढवू लागले आहे. यावरून अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी कॅनडाच्या भानगडीत भारतासोबत अमेरिकेचे संबंध रसातळाला जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे.
कॅनडासोबत सुरू असलेल्या राजनैतिक वादामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध काही काळासाठी रसातळाला जाऊ शकतात. अमेरिकेला भारतीय अधिकार्यांशी असलेले संपर्क अनिश्चित काळासाठी कमी करावे लागतील, असे गार्सेटी म्हणाले. यावरून बायडेन प्रशासनही सावध झाले आहे. भारताला वाकड्यात घेणे अमेरिकेला परवडणारे नाहीय, असे पॉलिटिकोने म्हटले आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव काही काळापासून शिगेला पोहोचला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी बिनबुडाचे आरोप केल्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने 40 कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले आहे.
भारताच्या या कठोर भूमिकेनंतर आता कॅनडाचे पंतप्रधानांनी गुडघे टेकले आहेत आणि भारतासोबतचा वाद वाढवू इच्छित नसल्याचे सांगत आहेत. राजनैतिक वादाबाबत भारतासोबत खाजगीत चर्चा करायची आहे, असे आता कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणत आहेत. कॅनडा हा अमेरिकेचा नाटोतील शेजारी आहे. तर भारत चीनविरोधात अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. यामुळे अमेरिकेला हे प्रकरण खूप जड जाणार आहे.