ऐकावं ते नवलच! "या" देशात पडणार सरड्यांचा पाऊस; तज्ज्ञांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:36 PM2020-12-29T12:36:11+5:302020-12-29T12:41:21+5:30
Iguanas News : सरडे अतिशय थंड वातावरण सहन करू शकत नाहीत. त्यामुळेच तापमानात घट झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर परिणाम होतो.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये (Florida) सरड्यांचा (Iguanas) पाऊस पडणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. फ्लोरिडा राज्याच्या हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. दक्षिण फ्लोरिडा राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत आहे. त्यामुळे सरडे झाडांवरून पडण्याची भीती आहे. दक्षिण फ्लोरिडामधील हे सरडे थंडीच्या दिवसात वास्तव्य करण्यासाठी बिळ खोदतात आणि त्यामुळे कालव्याच्या काठावर आणि अन्य ठिकाणी नुकसान होते.
सरड्यांमुळे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मियामीच्या नॅशनल वेदर सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील तापमान सातत्याने कमी होत आहे. त्यामुळेच हे सरडे झाडांवरून खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरडे झाडांवरून कोसळत असल्यास आश्चर्यचकीत होऊ नका, तापमान कमी असल्याने हे होत आहे असं एक ट्विटही करण्यात आलं आहे.
सरडे अतिशय थंड वातावरण सहन करू शकत नाहीत. त्यामुळेच तापमानात घट झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांना वाटते. कमी होत जाणाऱ्या तापमानापासून बचाव करण्यासाठी हे सरडे बिळ करून राहतात. तापमान अधिक असलेल्या ठिकाणी पाण्याजवळ वास्तव्य करतात. युनिर्व्हसिटी ऑफ जॉर्जियानुसार, या भागात तीन हजारांहून अधिक सरडे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.