अमेरिका, रशियाचे अंतराळवीर रवाना; आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे आज पोहोचण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 03:10 PM2024-03-05T15:10:09+5:302024-03-05T15:11:09+5:30
अंतराळवीर त्या स्थानकावर सहा महिने राहाणार आहेत.
केप कार्निव्हल : अमेरिकेचे तीन व रशियाचा एक असे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रविवारी रवाना झाले असून ते मंगळवारी तिथे पोहोचतील, अशी शक्यता आहे. अंतराळवीर त्या स्थानकावर सहा महिने राहाणार आहेत.
स्पेस एक्स या कंपनीच्या फाल्कन राॅकेटच्या साहाय्याने अवकाशयानाचे प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचे मॅथ्यू डॉमिनिक, मायकेल बॅरट, महिला अंतराळवीर जीनेट एप्स, रशियाचा अंतराळवीर अलेक्झांडर ग्रेबेंकिन हे चौघे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाईल. या स्थानकावर अमेरिका, डेन्मार्क, जपान, रशिया या चार देशांचे अंतराळवीर कार्यरत असून त्यांना अवकाशयानातून पृथ्वीवर परत आणले जाईल.
जीनेट एप्स दुसऱ्या कृष्णवर्णीय अंतराळवीर -
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर दाखल होणारी जीनेट एप्स या दुसरी कृष्णवर्णीय महिला आहेत. याआधी मे कॅरोल जेमिन्सन या कृष्णवर्णीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर १९९२ साली दाखल झाल्या होत्या. जीनेट एप्स यांनी अंतराळवीर बनण्याआधी फोर्ड मोटर कंपनी व सीआयएमध्ये इंजिनिअर म्हणून काम केले होते. मी कृष्णवर्णीय मुलींसाठी रोल मॉडेल असल्याचा मला अभिमान वाटतो, असे जीनेट यांनी सांगितले. २००९ साली त्या अंतराळवीर बनल्या. २०१८ साली रशियाच्या अवकाशयानातून त्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर जाणार होत्या, पण त्यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीस पाठविण्यात आले. त्यावेळी जीनेट यांना का वगळले याची कारणे कधीही जाहीर करण्यात आली नाहीत.
वेगवान वारे वाहत असल्याने नासाच्या अवकाशयानाचे प्रक्षेपण तीन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. अवकाश केंद्रावर दोन रॉकेटशीप पुढच्या सहा महिन्यांत येण्याची शक्यता आहे. नवीन स्टारलाइनर कॅप्सूल एप्रिलच्या या स्थानकावर येणार आहे.
सिएरा स्पेसचे एक मिनी शटलही तिथे दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन अवकाशयानांद्वारे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर लागणारी उपकरणे तिथे नेली जातील.