व्हेनेझुएलाच्या 'हुकुमशहा' राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने घातले निर्बंध
By sagar.sirsat | Published: August 1, 2017 07:04 AM2017-08-01T07:04:48+5:302017-08-01T12:31:07+5:30
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे.
वॉशिंग्टन, दि. 1 - अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याने अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध घातले. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे.
व्हेनेझुएलाच्या संविधानात बदल करुन स्वतःला अनिर्बंध अधिकार प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने निकोलस मादुरो यांनी रविवारी निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमुळेच निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीदरम्यान व्हेनेझुएलात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. हिंसाचारात 14 लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास 400 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय या निवडणुकांच्या विरोध प्रदर्शनात गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 120 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
''रविवारी झालेल्या बेकायदेशीर निवडणुकांमुळे सिद्ध झालं की मादुरो हे हुकुमशाहा आहे, ते व्हेनेझुएलाच्या जनतेच्या इच्छांची उपेक्षा करतात. त्यांच्यावर निर्बंध घालून त्यांच्या सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचं अमेरिकेने दाखवून दिलं. आमचा तेथील जनतेला पूर्णपणे पाठिंबा आहे, त्या जनतेला तेथे लोकशाही पुन्हा हवी आहे'' असं व्हाइट हाउसचे कोषागार सचिव स्टिव्हन म्नुचिन म्हणाले.
ट्रम्प सरकारने मादुरो यांना संविधानाचा सन्मान ठेवून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास सांगितलं होतं पण त्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं असं व्हाइट हाउसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.
दुसरीकडे, अमेरिकेची ही कारवाई उन्मत्त आणि बेकायदेशीर असल्याचं निकोलस मादुरो यांनी म्हटलं आहे.
मादुरो यांनी या निवडणुकीला क्रांतीकारी बदलाचं पर्व असल्याचं म्हटलं होतं, पण विरोधी पक्षांनी या निवडणुकीला बेकायदेशीर असल्याचं म्हणत बहिष्कार टाकला.