भारतावर निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा आताही विचार सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:22 AM2020-05-22T03:22:48+5:302020-05-22T03:26:02+5:30
अमेरिकेने इशारा दिल्यानंतरही भारताने आॅक्टोबर २०१८ मध्ये एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचे पाच संच खरेदी करण्याच्या रशियासमवेतच्या करारावर स्वाक्षरी केली.
वॉशिंग्टन : भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केल्यामुळे अमेरिकाभारतावर आताही निर्बंध घालण्याच्या विचारात आहे, असे अमेरिकेच्या एका ज्येष्ठ राजनयिकाने म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले आहे की, भारताला तंत्रज्ञान तसेच इतर बाबींमध्ये रणनीतिक प्रतिबद्धता द्यावी लागेल.
अमेरिकेने इशारा दिल्यानंतरही भारताने आॅक्टोबर २०१८ मध्ये एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचे पाच संच खरेदी करण्याच्या रशियासमवेतच्या करारावर स्वाक्षरी केली. भारताने या समझोत्यावर स्वाक्षरी केली, तर अमेरिका काऊंटरिंग अमेरिकाज अॅडव्हायजरीज थ्रू सँक्शन्स (सीएएटीएसए)अंतर्गत अमेरिकी निर्बंधाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा अमेरिकेने दिला होता. भारताने क्षेपणास्त्र प्रणालीसाठी मागील वर्षी रशियाला सुमारे ८० कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. एस-४०० ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी रशियाची सर्वांत अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली आहे.
अमेरिकेचा दक्षिण व मध्य आशिया व्यवहार प्रभार सांभाळणाऱ्या एलिक वेल्स यांनी वॉशिंग्टन डीसी येथे म्हटले आहे की, सीएएटीएसए ही संसदेसाठी एक नीतिगत प्राथमिकता बनलेली आहे. या सौद्यातून रशियाला होणारा आर्थिक फायदा, तसेच त्यातून शेजारी देशांची स्वायत्तता याकडेही पाहिले जात आहे. हा एक कठोर कायदा असून, त्याअंतर्गत अमेरिकेने रशियावर निर्बंध घातलेले आहेत. या कायद्यांतर्गत रशियाकडून जे देश संरक्षण सामग्री खरेदी करतात, त्या देशांवर अमेरिका दंडात्मक कारवाई करते.
भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या एका प्रश्नावर वेल्स यांनी म्हटले आहे की, सीएएटीएसए आताही एक मुद्दा आहे आणि तो बाजूला पडलेला नाही. भारत जेव्हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रणाली स्वत:कडे घेतो, तेव्हा खरोखरच एक बाब विचार करण्यासारखी आहे की, भारत कोणत्या प्रकारची व्यवस्था संचलित करू पाहत आहे?