अमेरिकेतील मध्यावधीत बराक ओबामांना झटका
By admin | Published: November 6, 2014 03:14 AM2014-11-06T03:14:50+5:302014-11-06T03:18:00+5:30
डेमोक्रॅट पक्षाबद्दल नागरिकांत असलेल्या नाराजीच्या लाटेमुळे रिपब्लिकन सदस्यांनी अमेरिकेच्या सिनेटचा ताबा घेतला
वॉशिंग्टन : डेमोक्रॅट पक्षाबद्दल नागरिकांत असलेल्या नाराजीच्या लाटेमुळे रिपब्लिकन सदस्यांनी अमेरिकेच्या सिनेटचा ताबा घेतला, आठ वर्षांनंतर रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात सिनेट आले असून, प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन पक्षाने आपली आघाडी अधिक मजबूत केली आहे. या पराभवामुळे अध्यक्ष ओबामा यांचे अमेरिकेच्या राजकारणातील महत्त्व काहीसे कमी झाले असून, विश्लेषक आताच त्यांची संभावना लेम डक अशी करू लागले आहेत.
आर्थिक पातळीवरचे असमाधान व राष्ट्राध्यक्षांबाबतचा राग यातून निर्माण झालेल्या डेमोक्रॅटविरोधी लाटेत रिपब्लिकन उमेदवारांनी डेमोक्रॅटचा प्रभाव असलेल्या जागा खेचून घेतल्या. त्यात उत्तर कॅरोलिना, कोलॅरॅडो , आयोवा, पश्चिम व्हर्जिनिया, अर्कान्सास, मोंटाना व दक्षिण डाकोटा या जागांचा समावेश आहे. २००६ नंतर प्रथमच रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये मेजॉरिटी मिळाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे केंटुकी येथील हुशार सिनेटर मिच मॅकॉनेल ही निवडणूक पुन्हा जिंकण्याच्या तयारीत असून, सिनेटचा मेजॉरिटी नेता होण्याचे अनेक वर्षे जोपासलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही निवडणूक मध्यावधी असली तरीही ती एखाद्या युद्धाप्रमाणे लढली गेली. जिल्ह्यामागून जिल्हे व राज्यामागून राज्ये रिपब्लिकन पक्षाने जिंकली. अनेक ठिकाणी अगदी कमी मताधिक्याने असेल, पण जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेने अद्याप वेग घेतलेला नाही, त्यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत, त्याचीच परिणती या निवडणुकीत रिपब्किन पक्षाला मते देण्यात झाली आहे. दक्षिणेकडील राज्ये व डोंगराळ भागात राजकीय ध्रुवीकरण झाले.
डेमोक्रॅट पक्षाचे अनेक वजनदार नेते या निवडणुकीत हरले असून, राजकीय विश्लेषकांच्या मते, ही रिपब्लिकनची लाट आहे. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हच्या ४३५ जागा, सिनेटच्या १०० पैकी ३६ जागा, तसेच अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी ३६ राज्यांतील गव्हर्नरच्या पदासाठी या निवडणुका घेण्यात आल्या. (वृत्तसंस्था)