अमेरिकेने केले ‘एच-१बी’ व्हिसा निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:55 AM2020-06-24T01:55:28+5:302020-06-24T01:57:11+5:30

या निर्णयाचा मोठा फटका भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना बसणार आहे.

US suspends H-1B visas | अमेरिकेने केले ‘एच-१बी’ व्हिसा निलंबित

अमेरिकेने केले ‘एच-१बी’ व्हिसा निलंबित

Next

वॉशिंग्टन : एच-१बी आणि विदेशी कामगारांना देण्यात येणारे इतर सर्व कामकाजी व्हिसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निलंबित केले असून, २०२० अखेरपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. या निर्णयाचा मोठा फटका भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना बसणार आहे.
अमेरिकेचे हे निवडणूक वर्ष असून, आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. हा आदेश २४ जूनपासून तातडीने लागू होणार आहे.
१ आॅक्टोबरला सुरू होणाऱ्या वित्त वर्ष २०२१साठी एच-१बी व्हिसा मिळालेले भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक आणि अमेरिकन व भारतीय कंपन्या यांना या आदेशाचा थेट फटका बसणार आहे. या व्हिसाधारकांना किमान हे वर्ष संपेपर्यंत अमेरिकेच्या दूतावासात जाऊन स्टॅम्पिंग करून घेता येणार नाही. एच-१बी व्हिसाचे नूतनीकरण करू इच्छिणाºया हजारो माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांनाही याचा थेट फटका बसणार आहे.
एच-१बी हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कौशल्याची गरज असलेल्या कामासाठी विदेशी व्यावसायिकांना अमेरिकेत आणण्याची परवानगी या व्हिसा अन्वये कंपन्यांना मिळते. अमेरिकेत काम करणाºया कंपन्या भारत आणि चीनमधून हजारो कर्मचाऱ्यांना या व्हिसाआधारे अमेरिकेत आणीत असतात. त्यामुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली भारतीय तंत्रज्ञांनी व्यापलेली दिसून येते.
ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये एक आदेश काढून परदेशी नागरिकांना अमेरिकेत कामासाठी येण्यावर निर्बंध आणले होते. हा आदेश आता संपणार होता. त्याला ट्रम्प प्रशासनाने २०२०च्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ देताना काही अतिथी कामगार व्हिसांचाही त्यात समावेश केला आहे. एल-१, एच-१बी, एच-४, एच-२बी आणि जे-१ हे ते व्हिसा होत.
अमेरिकेमधील बेरोजगारीचे प्रमाण घटत असले तरी आजही अनेक अमेरिकन हे नोकरीविना आहेत. त्यामुळे आपल्या तसेच पक्षाच्या विरोधामध्ये रोष वाढून त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसू नये, यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. मागील निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी ‘अमेरिकन फर्स्ट’ हा नारा देत निवडणूक लढविली होती.
।५.२५ लाख नोकºया होणार मोकळ्या
एच-१बी आणि इतर सर्व कामकाजी व्हिसा निलंबित केल्यामुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांसाठी ५.२५ लाख रोजगार मोकळे होतील, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अमेरिकी नागरिक लवकरात लवकर कामावर परतावेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत.
।ट्रम्प प्रशासनावर चौफेर टीका
सर्व प्रकारचे कामकाजी व्हिसा निलंबित केल्याबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. औद्योगिक क्षेत्र, खासदार आणि हक्क संघटना यांचा टीकाकारांत समावेश आहे. भारतीय वंशाचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटले की, व्हिसा कार्यक्रम निलंबित केल्यामुळे आपली अर्थव्यवस्था कमजोर होईल. कोरोनासारख्या संकटाच्या काळात आरोग्यक्षेत्रातील श्रमशक्तीवर परिणाम होईल.
यूएस चेम्बर्स आॅफ कॉमर्सचे सीईओ थॉमस डोनोह्यू यांनी म्हटले की, या निर्णयाने आपल्या देशाला कोणतीही मदत होणार नाही. उलट देश मागे खेचला जाईल.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले की, आजच्या आदेशाने मी निराश झालो आहे. आव्रजकांनी अमेरिकेच्या यशात मोठे योगदान दिलेले आहे.
‘लीडरशिप कॉन्फरन्स आॅन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्युमन राइट्स’च्या अध्यक्ष व सीईओ वनिता गुप्ता म्हटले की, आव्रजकांना लक्ष्य करणारा ट्रम्प यांचा आदेश काम करणार नाही. न्यायालयाकडून त्याला तात्काळ स्थगिती मिळेल.

Web Title: US suspends H-1B visas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.