Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; 45 जणांवर प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 08:05 AM2020-03-17T08:05:06+5:302020-03-17T08:09:21+5:30
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.
वॉशिंग्टनः जगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनंही याला महारोगराई घोषित केलं आहे. या भयंकर रोगानं जगभरात आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतही 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीचं परीक्षण घेण्यास सुरुवात केली असून, सोमवारी पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.
चीनमधलं वुहान हे कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू असून, 141 देशांमध्ये व्हायरसनं हातपाय पसरले आहेत. विशेष म्हणजे चीनलाही या रोगावर निश्चित लस किंवा औषध विकसित करता आलेलं नाही. डॉ. जॅक्सन यांच्या मते, कोरोना व्हायरससारखी आपत्ती दूर ठेवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचं आहे. ओळख उघड न करण्याच्या अटीवर 45 कोरोनाबाधित रुग्णांना या प्रयोगासाठी निवडण्यात आलं असून, त्यांना टप्प्याटप्प्यानं ही लस देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी डॉक्टर घेत आहेत. सोमवारी एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. त्यानंतर आता आणखी तीन लोकांना ही लस देण्यात येणार आहे. या 45 लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या लसीचा सर्वांवर पडणाऱ्या प्रभावाचं निरीक्षण केलं जात आहे.
US President: I'm pleased to report that a vaccine candidate has begun the phase-1 clinical trial, it's one of the fastest vaccine development launches in history. We're also racing to develop anti viral therapies & other treatments, we have some promising early results. #COVID19pic.twitter.com/IPc6hCgb9t
— ANI (@ANI) March 16, 2020
या लसीला mRNA-1273 हे कोडनाव देण्यात आलं आहे. अमेरिकाच नव्हे, तर देशसुद्धा कोरोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. यात रशिया, चीन आणि दक्षिण कोरियाचाही समावेश आहे. या प्रयोगासाठी 18 ते 55 वय वर्ष असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. यांच्या रक्ताचा नमुना तपासून लसीचा कोणताही दुष्परिणाम झाला आहे की नाही, याची चाचपणी केली जाणार आहे. खरं तर ही लस रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी आहे. डॉक्टरांनी या लसीनं रुग्णाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.