पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलं भाजपाचं सुवर्ण युग, अमेरिकी थिंक टँक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 05:08 PM2017-08-04T17:08:21+5:302017-08-04T17:09:12+5:30
भारतीय वंशाच्या अमेरिकी थिंक टँकनं भाजपाच्या कामाचं कौतुक केलंय.
वॉशिंग्टन, दि. 4 - भारतीय वंशाच्या अमेरिकी थिंक टँकनं भाजपाच्या कामाचं कौतुक केलंय. बिहारच्या राजकारणात भाजपानं ज्या प्रकारे पुन्हा सत्ता मिळवून त्यावर स्वतःची मजबूत पकड मिळवली. ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या सुवर्ण युगाची सुरुवात केली आहे, असं विधान अमेरिकी थिंक टँकनं केलंय. कार्नेगी एंडॉन्मेंट फॉर इंटरनॅशनल पीसमधले दक्षिण आशियाच्या कार्यक्रमाचे संचालक मिलन वैष्णव यांनी एका संपादकीयमधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
नेहरू-गांधी कुटुंबीयांनी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलेल्या देशात आता भाजपा राजकारणाचा नवा केंद्रबिंदू झाला आहे. 2019मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच भारतातील शक्तिशाली राज्यांत स्वतःची पकड मजबूत करण्याच्या दिशेनं जबरदस्त गतीनं पुढे जातोय. तसेच भाजपा सरकार दिवसेंदिवस स्थिरता आणि मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र त्याचबरोबर भारतात लोकशाहीचं संतुलन बिघडत असल्यानं परिस्थिती चिंताजनक झाली आहे. वैष्णव यांच्या मते, भाजपाची व्यापार अनुकूल नीती, राष्ट्रवादी भाषणबाजी आणि युवापिढीला केलेलं अपील या माध्यमातून मोदींनी अनेक राज्यांत सत्ता मिळवली आहे. तीन दशकांत बहुमत सिद्ध करणारा पहिला पक्ष बनलेल्या भाजपाचा मोदींनी सुवर्ण काळाचा प्रारंभ केला आहे. बिहारमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर राज्यसभेत भाजपा लवकरच बहुमत सिद्ध करणार आहे. हे काम 2018पर्यंत पूर्ण होणार आहे. भाजपा दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात आहे.
देशात भाजपाचा वारू सद्यस्थितीत चौफेर उधळला आहे. पूर्वेपासून ते उत्तर भारतातील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता स्थापन करत दबदबा निर्माण केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ भाजपानं नितीश कुमारांच्या मदतीनं बिहारमध्ये सत्ता काबिज केली. त्यानंतर भाजपानं आता दक्षिण भारताकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.
तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून आधीच निवृत्ती घेतली आहे. तर जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील जनतेमध्ये चांगली प्रतिमा असलेला सद्यस्थितीत एकही नेता नाही. त्या मुद्द्याचा फायदा उठवत भाजपानं तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याची योजना आखली आहे. 2016च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अमित शाह यांनी नवी रणनीती तयार केली आहे. भाजपानं तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपानं पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत. तर इतर 5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.