चीनविरोधात अमेरिकेची मोठी कारवाई; डोनाल्ड ट्रम्प यांची हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्यावर स्वाक्षरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:23 AM2020-07-15T07:23:27+5:302020-07-15T07:26:06+5:30
हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवले जाईल. अमेरिकेचा फायदा चीनने घेतला परंतु त्या बदल्यात व्हायरस दिला, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोनासाठी चीनला जबाबदार धरलं आहे.
वॉशिंग्टन - अमेरिका आणि चीनमधील मतभेद आता आणखी तीव्र होताना दिसत आहेत. या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरूद्ध कठोर बंदी घालण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. यासह हाँगकाँगसोबतचा प्राधान्य व्यापार दर्जाही काढून घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी हाँगकाँगमधील दडपशाहीच्या कारवायांवर आणि अत्याचारासाठी चीनवर दोषारोप ठेवत म्हटले होते की, या कायद्यामुळे चीनला त्याच्या दुष्कर्मांसाठी जबाबदार धरायला अनेक अधिकार मिळतील.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे माध्यमांना सांगितले की, हाँगकाँगमध्ये काय घडत आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. अशात त्यांची स्वायत्तता संपवणे योग्य नाही. आम्ही चिनी तंत्रज्ञान आणि टेलिकॉम प्रोवाइडर्सचा सामना केला. सुरक्षेच्या कारणास्तव, अनेक देशांना आम्हाला हे पटवून द्यावे लागले की हुवावे धोकादायक आहे. आता यूकेनेही यावर बंदी घातली आहे असं ते म्हणाले.
तसेच हाँगकाँगमध्ये सध्या काय घडले हे आम्ही बघितले आहे. फ्रि मार्केटमध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांचे स्वातंत्र्य काढून घेण्यात आले. बरेच लोक आता हाँगकाँग सोडत आहेत असं मला वाटते. आम्ही खूप चांगली स्पर्धा गमावली आहे. आम्ही त्यांच्यासाठी बरेच काही केले. आता हाँगकाँगला कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जाणार नाहीत. हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवले जाईल. अमेरिकेचा फायदा चीनने घेतला परंतु त्या बदल्यात व्हायरस दिला, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोनासाठी चीनला जबाबदार धरलं आहे.
Today, I signed legislation and an executive order to hold China accountable for its oppressive actions against the people of Hong Kong. Hong Kong Autonomy Act which I signed this afternoon passed unanimously through Congress: US President Donald Trump pic.twitter.com/EZWbSqNexF
— ANI (@ANI) July 14, 2020
दरम्यान, विकसनशील देशाच्या नावाखाली चीनला नेहमीच अमेरिकेचा फायदा होत राहिला आणि आधीच्या सरकारांनीही त्यांना मदत केली. आमच्या सरकारने चीनविरूद्ध कठोर पावलं उचलली आहेत, कारण तो यासाठी पात्र नाही, चीनमुळे आज जगाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे असं सांगत ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवरही जोरदार टीका केली, ही संघटना चीनची बाहुली आहे. जगभर हा विषाणू पसरविण्यास चीनच जबाबदार आहे असं सांगण्याची मला काहीच चुकीचं वाटत नाही असंही ट्रम्प यांनी सांगितले.