सत्तेत येताच बायडेन यांनी उचललं मोठं पाऊल; पाकिस्तानच्या चिंतेत होणार वाढ
By जयदीप दाभोळकर | Published: January 26, 2021 01:49 PM2021-01-26T13:49:39+5:302021-01-26T13:52:15+5:30
यापूर्वी पाकिस्ताननं बायडेन सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान-अमेरिका यांच्यातील संबंध सुधारतील अशी अपेक्षा केली होती व्यक्त
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षे जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच एकदम अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. सूत्र हाती घेताच बायडेन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही निर्णय मागे घेतले होते. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत काही निर्बंधही लागू केले होतं. आता त्यांच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानला एक मोठा झटका लागला आहे. अमेरिकेने दक्षिण आशियातील तीन देशांसाठी आपली ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये प्रवास हा अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेनं आपल्या देशातील नागरिकांना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा प्रवास न करण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी तीन देशांसाठी वेगळी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जाहीर केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसा याकडे पाहता अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानचा प्रवास करताना विचार करावा. अमेरिकेनं दहशतवाद आणि अपहरणासारख्या गोष्टींकडे पाहता आपल्या नागरिकांना पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वां प्रांतात न जाण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त या अॅडव्हायझरीमध्ये अमेरिकन नागरिकांना दशहतवाद आणि शसस्त्र हिंसाचाराची शक्यता पाहता भारत-पाकिस्तान सीमेपासून (एलओसी) दूर राहण्यास सांगिकलं आहे. या भागात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचं सांगत अमेरिकेनं हा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानव्यतिरिक्त अमेरिकेनं आपल्या नागरिकांना बांगलादेश आणि अफगाणिस्तानचाही प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाव्यतिरिक्त बांगलादेशमध्ये गुन्हेगारी, दहशतवाद आणि अपहरणासारख्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. तसंच अशाच प्रकारची अॅडव्हायझरी अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या बाबतही जारी केली आहे.
यापूर्वी पाकिस्ताननं बायडेन सरकार आल्यानंतर पाकिस्तान-अमेरिका यांच्यातील संबंध सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी गेल्या चार वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये बदल घडले असल्याचं अमेरिकेनं समजून घ्यावं असं वक्तव्य केलं होतं. तसंच बदल लक्षात घेऊन संबंधांचा पाया रचला गेला पाहिजे असंही ते म्हणाले होते. "गेल्या चार वर्षांमध्ये जग बदलत आहे आणि पाकिस्तानही. आता तुम्हाला नव्या पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करायला हवे," असं कुरैशी म्हणाले होते. तसंच त्यांनी बायडेन सरकारमधील परराष्ट्र मंत्री बनणाऱ्या अँटना ब्लिंकेन यांनादेखील एक पत्र लिहिलं होतं.
तर दुसरीकडे बायडेन प्रशासनात संरक्षण मंत्रीपदाची धुरा हाती घेणारे लॉईड ऑस्टिन यांनीदेखील दहशतवादाबाबत पाकिस्तानला कठोर संदेश दिला होता. "पाकिस्ताननं आपल्या देशाच्या भूमिचा वापर दहशतवादी आणि कट्टरपंथीयांना आसरा देण्यासाठी करू नये यासाठी आम्ही पाकिस्तानवर दबाव टाकत राहू," असं ते म्हणाले होतं. भारत विरोधी दहशतवादी संघटनांच्या बाबतीत कारवाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. आम्ही भारताचे मुख्य सुरक्षा सहकारी म्हणून काम करत राहू आणि क्वॅडद्वारे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वाढवलं जाणार असल्याचंही ऑस्टिन यांनी नमूद केलं होतं.