Coronavirus Update: ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन, फ्रान्समध्ये बिकट परिस्थिती, रशियात ९६८ मृत्यू; तर अमेरिकेत १ हजार उड्डाणं रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 10:05 PM2021-12-26T22:05:18+5:302021-12-26T22:06:07+5:30
Coronavirus Update: कोरोना महामारीमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे.
Coronavirus Update: कोरोना महामारीमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. ब्रिटनसोबतच फ्रान्समध्येही कोरोनाची नवी लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये शनिवारी दिवसभरात तब्बल १ लाख चार हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातच ब्रिटनमध्ये ख्रिसमसचा काळ पाहता कोरोना संक्रमणाचे आकडे सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे. पण शुक्रवारी ब्रिटनमध्ये १ लाख २२ हजार १८६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत.
पीटीआयच्या माहितीनुसार वेल्स, स्कॉटलँड आणि आयर्लंडच्या उत्तर भागात रविवारपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वेल्समध्ये रविवारपासून नाइटक्लब्सवर बंदी घालण्यात आली आहे. तर पब, रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांवरही निर्बंध लागू करण्या आले आहेत. बंदिस्त जागेत जास्तीत जास्त ३० जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. तर खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीला मान्यता असणार आहे.
रशियात ९६८ जणांचा मृत्यू
रशियात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाला असून गेल्या २४ तासात ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचे २३७२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच रशियातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढून आता १०,३९२,०२० वर पोहोचला आहे. तर मृत्यूंची संख्या ३०४२१८ इतकी झाली आहे.
अमेरिकेकडून १ हजार उड्डाणं रद्द
अमेरिकेत तर कोरोनानं ख्रिसमसच्या सेलिब्रेशनवर पाणी फेरलं आहे. विमान कंपन्यांनी शनिवारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एअरलाइन्समध्ये कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कंपन्यांना उड्डाणं रद्द करावी लागली असल्याचं कारण दिलं जात आहे. रविवारी अमेरिकेत जवळपास १ हजार उड्डाणं रद्द झाली आहेत.