"आई, मला माफ कर"; १४ वर्षांच्या मुलाने शाळेत केला गोळीबार, चौघांचा मृत्यू, ३० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:32 AM2024-09-09T11:32:31+5:302024-09-09T11:33:17+5:30
अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. जॉर्जियाच्या बॅरो काउंटीमधील अपलाची हायस्कूलमध्ये गोळीबार झाला.
अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. जॉर्जियाच्या बॅरो काउंटीमधील अपलाची हायस्कूलमध्ये गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या १४ वर्षीय शूटरने गुन्हा करण्यापूर्वी एका टेक्स्ट मेसेजमध्ये आपल्या आईची माफी मागितली होती, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
शनिवारी द वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत, आरोपी कोल्ट ग्रे याचे आजोबा चार्ल्स पोलहमस म्हणाले की, त्याच्या या मेसेजमुळे त्याच्या आईने ही घटना टाळण्यासाठी शाळेत कॉल केला. तसेच ती आपल्या मुलाला भेटण्यासाठी घरी आली. "आई, मला माफ कर" असं मेसेजमध्ये म्हटलं होतं.
आरोपीच्या आईने या घटनेची माहिती शाळेला दिली होती. गोळीबाराच्या काही मिनिटं अगोदर एक एडमिनिस्ट्रेटर हल्लेखोराचा शोध घेत होता. त्यासाठी तो त्याच्या वर्गातही गेला होता, मात्र मुलगा तिथे सापडला नाही. घटनेनंतर मुलाने अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत झालेल्या गोळीबारात ३० जण जखमी झाले आहेत. याशिवाय पोलिसांनी आरोपी कोल्ट आणि त्याचे वडील कोलिन ग्रे या दोघांवरही हत्येचा आरोप केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोलिनने आपल्या मुलाला शूटिंगमध्ये वापरण्यात आलेली AR-15-स्टाईल असॉल्ट रायफल ख्रिसमसमध्ये भेट म्हणून दिली होती.