बलात्कारांच्या घटनांमुळे काश्मीरला जाणं टाळा, अमेरिकी नागरिकांसाठी नवीन पर्यटन सूचनावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:50 AM2018-01-11T10:50:50+5:302018-01-11T10:53:57+5:30
अमेरिकेने भारतात जाणा-या आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये (अॅडव्हायजरी) भारताची बदनामी होत असल्याचं दिसत आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेने भारतात जाणा-या आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये (अॅडव्हायजरी) भारताची बदनामी होत असल्याचं दिसत आहे. ज्यांना भारतात पर्यटनासाठी जायचे आहे, त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाणे टाळावे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटले आहे. विशेषत: जर महिला भारतात जाणार असतील तर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
10 जानेवारीला अमेरिकेनं आपली नवीन ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात भारताला दुस-या स्तरावर तर पाकिस्तानला तिस-या स्तरावर ठेवण्यात आले आहे. अमेरिकेत स्तराच्या आधारे अन्य देशांना सुरक्षिततेसंदर्भाचे अनुमान लावले जातात व यावरुन अमेरिकी नागरिकांना त्यावर सतर्क केले जाते.
अमेरिकी नागरिकांसाठी काय आहेत नेमक्या सूचना?
- दहशतवादी कारवाया आणि काश्मिरी लोकांचा उद्रेक पाहता जम्मू काश्मीरला (लेह-लडाख वगळता) भेट देणे टाळावे.
- भारत-पाकिस्तान सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात सातत्यानं लष्करी कारवाया होत आहेत, तिथून प्रवास टाळावा.
- महिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी
- भारतात बलात्काराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे महिलांनी अधिक काळजी घ्यावी
- अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना सेव्हन सिस्टर्स अर्थात आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या सात राज्यांमध्ये जाण्याची परवानगी नाही.
USA issues new travel advisory for its citizens, India at level 2 (exercise increased caution) pic.twitter.com/7rBVArg8X9
— ANI (@ANI) January 11, 2018