...तर त्या देशांवर जास्तीत जास्त कर लादू; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत, चीनला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:58 IST2025-01-28T16:58:28+5:302025-01-28T16:58:56+5:30
USA News: आम्हाला त्रास होणार असेल, तर आम्ही त्या देशांवर नक्कीच कर लादणार...

...तर त्या देशांवर जास्तीत जास्त कर लादू; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत, चीनला थेट इशारा
USA News: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून अवैध रहिवासी आणि टॅरिफसंबंधी मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच, ट्रम्प यांनी मंगळवारी (28 जानेवारी 2025) पुन्हा एकदा अमेरिकेच्या हितासाठी शुल्क लादण्याबाबत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही देशावर सरकार कर लागू करेल. भारत, चीन आणि ब्राझीलचे नाव घेत ते म्हणाले की, हे देश अमेरिकेवर सर्वाधिक कर लावतात.
फ्लोरिडा येथे रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही त्या देशांवर आणि बाहेरील लोकांवर कर लादणार आहोत जे आमचे नुकसान करतील. ते त्यांच्या देशासाठी चांगले काम करत असले तरी त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. आम्हाला त्रास होणार असेल, तर आम्ही अशा देशांवर नक्कीच कर लादणार आहोत. चीनमध्ये प्रचंड शुल्क आकारले जाते. भारत, ब्राझील आणि इतर अनेक या यादीत आहेत.
आता आम्ही असे होऊ देणार नाहीत, कारण आमचे अमेरिकेला प्रथम प्राधान्य असेल. अमेरिका अशी व्यवस्था निर्माण करेल, जी न्याय्य असेल आणि आपल्या तिजोरीत पैसा आणेल, जेणेकरुन अमेरिका पुन्हा श्रीमंत होईल. आम्ही आमच्या नागरिकांवर कर लादून इतर देशांना समृद्ध करणार नाही, तर इतर देशांवर कर लादून आम्ही आमच्या नागरिकांना श्रीमंत बनवू. इतर देशांवरील शुल्क वाढल्याने अमेरिकन लोकांवरील कर कमी होतील आणि अधिक रोजगार आणि कारखाने निर्माण होतील.
ट्रम्प यांनी यापूर्वीही ब्रिक्स देशांवर 100 टक्के कर लागू करण्याची धमकी दिली आहे. भारतही ब्रिक्स समूहाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या घोषणेमुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. ज्यांना शुल्क टाळायचे आहे, त्यांनी अमेरिकेत कंपन्या आणि कारखाने सुरू करावे,असेही ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. ट्रम्प पुढे म्हणाले की, युनायटेड स्टेट्स येथे कारखाने उभारणाऱ्या कंपन्यांना, विशेषत: फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर आणि स्टील सारख्या उद्योगांमध्ये मदत करेल.