इसिसने हल्ल्यात केला ‘क्लोरिन’चा वापर; कुर्दांचा दावा
By Admin | Published: March 15, 2015 11:07 PM2015-03-15T23:07:14+5:302015-03-15T23:07:14+5:30
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने उत्तर इराकमध्ये पेशमेर्गा लढवय्यांविरुद्ध क्लोरिन वायूचा रासायनिक शस्त्र म्हणून वापर केला होता, असा दावा इराकी कुर्द प्रशासनाने पुराव्यासह केला आहे.
अर्बिल (इराक) : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने उत्तर इराकमध्ये पेशमेर्गा लढवय्यांविरुद्ध क्लोरिन वायूचा रासायनिक शस्त्र म्हणून वापर केला होता, असा दावा इराकी कुर्द प्रशासनाने पुराव्यासह केला आहे.
स्वायत्त कुर्दिश प्रदेशच्या सुरक्षा परिषदेच्या निवेदनात म्हटले आहे की, २३ जानेवारी रोजी इसिसने कार बॉम्ब हल्ला केला होता. हल्ल्याच्या ठिकाणांवरील माती व कपड्यांचे नमुने पेशमेर्गाने गोळा केले होते. त्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यात क्लोरिन आढळले. रासायनिक शस्त्र म्हणून क्लोरिनचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट होते, असे कुर्दने म्हटले आहे. तथापि, कुर्दच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पहिल्या महायुद्धात रासायनिक शस्त्र म्हणून क्लोरिन वायूचा वापर करण्यात आला होता. १९९७ च्या रासायनिक शस्त्रास्त्र करारानुसार युद्धभूमीवर सर्व विषारी घटकांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.(वृत्तसंस्था)