भारतीय लष्कराविरुद्ध दहशतवाद्यांचा वापर
By admin | Published: November 5, 2014 01:24 AM2014-11-05T01:24:03+5:302014-11-05T01:24:03+5:30
पाकिस्तानात दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या आश्रयाचा आढावा सादर करताना अमेरिकन लष्कर पेंटगॉनने अमेरिकी काँग्रेसला असे स्पष्ट सांगितले आहे
वॉशिंग्टन : पाकिस्तानात दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या आश्रयाचा आढावा सादर करताना अमेरिकन लष्कर पेंटगॉनने अमेरिकी काँग्रेसला असे स्पष्ट सांगितले आहे की, भारताच्या सक्षम लष्कराशी थेट लढण्याची पाकची क्षमता नाही, त्यामुळे भारताविरोधात पाक दहशतवाद्यांचा वापर करत आहे.
अफगाण व भारत यांच्याविरोधात कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानात आश्रय घेतात. अफगाण व परिसरासाठी ही धोकादायक बाब आहे. तसेच पाकिस्तान भारताच्या सुपर लष्कराच्याविरोधात दहशतवाद्यांचा वापर करत आहे, असे पेंटगॉनतर्फे काँग्रेसला सांगण्यात आले.
अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीवर सहा महिन्यांच्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. अफगाणिस्तानला मदत करण्याच्या गोष्टी पाकिस्तान वरवर बोलतो; पण दहशतवादी संघटनांच्या कारवाया अफगाण पाक संबंधात बाधा आणतात, असे पेंटगॉनने या १०० पानी अहवालात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाआधी भारताच्या हेरत येथील दूतावासावर हल्ला करण्यात आला. चार सशस्त्र हल्लेखोरांनी मे महिन्यात अफगाणिस्तानातील हेरत येथील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता.
हा हल्ला शपथविधीच्या फक्त तीन दिवस आधी करण्यात आला. जूनमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने लष्कर ए तोयबा ही संघटना या हल्ल्यास जबाबदार असल्याचे जाहीर केले. अफगाण अध्यक्षांनी या हल्ल्याचा निषेध करून भारताला पाठिंबा जाहीर केला होता, असे या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)