'या' देशात Facebook आणि Whatsapp वापरण्यासाठी द्यावा लागणार टॅक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 01:01 PM2018-06-02T13:01:56+5:302018-06-02T13:04:50+5:30
फेक न्यूज व गॉसिप्सवर लगाम लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
लंडन- व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर करण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. पण एक असा देश आहे जिथे या सोशल नेटवर्किंग साइट्स वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आफ्रीकी देश युगांडामध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि वायबरसारखे सोशल मीडिया अॅप्स वापरण्यावर टॅक्स लावला आहे. फेक न्यूज व गॉसिप्सवर लगाम लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा नवा नियम तेथे 1 जुलैपासून लागू होणार आहे. या नव्या नियामानुसार, सोशल मीडियाचा वापर केल्यावर तेथे 200 शिलिंग म्हणजेत दिवसाला साडेतीन रूपये टॅक्स द्यावा लागेल.
युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसवेनी यांनी मार्च महिन्यात सोशल मीडिया लॉमध्येही बदल केले. सोशल मीडियाचा वापर करून गॉसिप आणि फेक न्यूज पसरविल्या जात असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. सोशल मीडिया टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेल्या रक्कमेचा वापर ते फेक न्यूजपासून देशाला वाचविण्यासाठी होईल, असं त्यांनी अर्थ मंत्रालयाला पत्राद्वारे सांगितलं होतं. तसंच सोशल मीडियाच्या वापरातून मिळणाऱ्या वाढीव टॅक्सद्वारे देशावरील कर्ज कमी करण्यासही हातभार लागेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, नागरिकांकडून टॅक्स नेमका कसा जमा करावा, याबद्दल तेथिल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या संभ्रमात आहेत. सोशल मीडिया व्यतिरिक्त सरकारने मोबाइन मनी ट्रान्झॅक्शनवरही 1 टक्का टॅक्स लावला आहे.