युट्युबच्या प्रिमीयम सेवांसाठी आता युजर्सला मोजावे लागणार पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 02:21 PM2018-05-18T14:21:52+5:302018-05-18T14:21:52+5:30
युट्युबने आता आपल्या ग्राहकांसाठी प्रिमीयम सेवा लाँच केल्या असून यात युजर्ससाठी दोन स्वतंत्र प्लॅन सादर करण्यात आले आहेत.
युट्युबने आता आपल्या ग्राहकांसाठी प्रिमीयम सेवा लाँच केल्या असून यात युजर्ससाठी दोन स्वतंत्र प्लॅन सादर करण्यात आले आहेत.
खरं तर, युट्युबवर ऑक्टोबर २०१५ पासूनच युट्युब रेड या नावाने प्रिमीयम सेवा सुरू आहे. तथापि, याशिवाय युट्युब अजून एक नवीन सेवा सुरू करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून युट्युबने एका ब्लॉग-पोस्टच्या माध्यमातून यावर शिक्कामोर्तब केले आहे. यात युट्युब प्रिमीयम या नावाने नवीन पेड सेवा सुरू करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी ग्राहकाला दरमहा ११.९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. यामुळे आता युट्युब रेड ही सेवा समाप्त होणार असून याचेच रूपांतर युट्युब प्रिमीयममध्ये करण्यात आले आहे. अर्थात यात काही नवीन फिचर्सची जोड देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत आता ग्राहकाला युट्युब ओरिजनल्स पाहता येणार आहे. यात दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, डॉक्युमेंटरीज आदींचा समावेश असेल.
दरम्यान, यासोबत युट्युब म्युझिक ही नवीन सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही म्युझिक स्ट्रीमिंग सेवा होय. याच्या अंतर्गत ग्राहकाला जाहिराती नसलेल्या संगीताचा आनंद घेता येणार आहे. युट्युबवर असणार्या लक्षावधी गाण्यांच्या खजिन्यातून ग्राहकाला हवे ते ऐकता येणार आहे. यासाठी स्वतंत्र अॅप आणि डेस्कटॉपसाठी प्लेअर लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकाला ऑफलाईन असतांनाही संगीत ऐकण्याची सुविधा दिलेली आहे. आगामी काळात गुगल प्ले म्युझिकचा यामध्ये विलय होऊ शकतो. युट्युब प्रिमीयम सेवा घेणार्यांना याचा लाभ घेता येणार आहे. मात्र कुणालाही ही सेवा स्वतंत्र हवी असल्यास महिन्याला ९.९९ डॉलर्सची आकारणी करण्यात येणार आहे. सध्या या दोन्ही सेवा अमेरिकेसह अन्य काही राष्ट्रांमध्ये लाँच करण्यात आला आहेत. भारतात याला आगामी कालखंडात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.