ऑफिसच्या कामात ईमोजीचा वापर? नको रे बाबा! इस्रायलमधील संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:23 AM2022-03-21T06:23:49+5:302022-03-21T06:24:46+5:30
संदेशांमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते.
तेल अवीव : कार्यालयीन कामकाजातील संदेशांत जर कोणी ईमोजी व अन्य ग्राफिक्सचा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात वापर करत असेल तर त्या कर्मचाऱ्याची मते फारशी गांभीर्याने घेतली जात नाहीत, असे एका पाहणीत आढळून आले आहे. संदेशांमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते.
व्हॉट्सॲप व टेलिग्रामवर परस्परांना संदेश पाठविताना ईमोजींचा वापर होतो. मात्र, कार्यालयीन कामकाजात संभाषणाचे सारे संकेत पाळणे आवश्यक असते, असे मत कॉलेर स्कूल ऑफ मनेजमेंटचे डॉ. शाय डॅन्झिगर यांनी व्यक्त केले.
- कार्यालयीन संदेशात शब्दांनी जे काम होते, तो परिणाम ईमोजींनी फारसा साधला जात नाही.
- काही लोक कार्यालयात आपल्या कंपनीचा लोगो असलेले टी-शर्ट घालून येतात.
- त्यांनाही त्यांच्या कार्यालयातील किंवा अन्य कंपन्यांचे लोक फार गांभीर्याने घेत नाहीत.
- ईमोजींचा अधिक वापर असलेला संदेश अनौपचारिक स्वरूपाचा वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
- ही पाहणी इस्रायलमधील तेल अवीवमधील कॉलेर स्कूल ऑफ मॅनेजमेन्टतर्फे करण्यात आली. त्याच्या निष्कर्षावर आधारित लेख ऑर्गनायझेशनल बिहेवियर ॲन्ड ह्यूमन डिसिजन प्रोसेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
- संशोधकांनी या लेखात म्हटले आहे की, जो कर्मचारी आपल्या ई-मेलमध्ये, झूम प्रोफाइलमध्ये छायाचित्रे, ईमोजींचा अधिक वापर करतो, त्याच्या मताला लोक फार महत्त्व देत नाहीत. ही व्यक्ती उच्चाधिकारी नसावी, असे लोकांचे मत होते.
- कार्यालयीन कामकाजात ईमोजींचा वापर न करणा-या व्यक्ती कामातही उत्तम असतात, असे निरीक्षण आहे.