स्वतःच्या जोखमीवर कोरोना लस घ्या; पाकिस्तानातील मंत्र्याचा सल्ला
By देवेश फडके | Published: February 3, 2021 03:40 PM2021-02-03T15:40:05+5:302021-02-03T15:41:48+5:30
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील आरोग्य मंत्री डॉ. यासमीन राशिद यांनी स्थानिकांना स्वतःच्या जोखमीवर कोरोना लस घेण्याचे सल्ला दिला आहे.
इस्लामाबाद : जागतिक स्तरावरील बहुतांश देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. कोरोना संकटामुळे अवघे जग ठप्प झाले होते. मात्र, हळूहळू जग यातून सावरताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमी होताना दिसतेय. कोरोना लसीकरण सुरू झालेल्या देशांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी लसीचा डोस घ्यावा, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये याउलट चित्र असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील आरोग्य मंत्री डॉ. यासमीन राशिद यांनी स्थानिकांना स्वतःच्या जोखमीवर कोरोना लस घेण्याचे सल्ला दिला आहे. याबाबत बोलताना डॉ. यासमीन राशिद यांनी सांगितले की, कोरोना लसीकरणाचे अनेक प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाले आहेत. कोरोना लसीकरणामुळे अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे स्वतःच्या जोखमीवर कोरोना लसीचा डोस घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी
आतापर्यंत निश्चित सांगता येणार नाही की, कोरोना लसीकरणानंतर किती कालावधीपर्यंत लसीचा प्रभाव शरीरात राहतो. संपूर्ण जगभरात अद्यापही कोरोना विषाणू संसर्ग आणि लसीवर संशोधन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणालाही जबरदस्तीने कोरोना लस दिली जाणार नाही. कोरोना लसीच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लाहोर येथील १८ ठिकाणी अजूनही लॉकडाऊन कायम आहे. कोरोना संक्रमितांचा आकडा हळूहळू कमी होतोय, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पाकिस्तानात कोरोना लसीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस मोफत दिली जाणार आहे. तसेच ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर ५० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. आगामी चार ते पाच महिन्यात अधिकाधिक नागरिकांना कोरोना लस देण्याचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.