चिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 03:06 AM2020-09-19T03:06:29+5:302020-09-19T05:51:50+5:30
552 निरोगी स्वयंसेवकांची या मानवी चाचण्यांसाठी सिनोव्हॅकने निवड केली असून, त्यात तीन ते 17 वर्षे वयापर्यंतच्या काही मुलांचाही समावेश आहे.
बीजिंग : चीनमधील सिनोव्हॅक ही कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकत्रित प्रयोगांना 28 सप्टेंबरपासून हेबेई प्रांतामध्ये सुरुवात करणार आहे. त्यामध्ये लहान तसेच किशोरवयीन मुलांना ही लस टोचण्यात येणार आहे.
552 निरोगी स्वयंसेवकांची या मानवी चाचण्यांसाठी सिनोव्हॅकने निवड केली असून, त्यात तीन ते 17 वर्षे वयापर्यंतच्या काही मुलांचाही समावेश आहे. 02 डोस या मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचे टोचण्यात येतील.
- कोरोना साथीच्या काळात अमेरिकेमध्ये त्या विषाणूचा संसर्ग झालेल्या शेकडो मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अंगावर चट्टे उमटणे, ताप, अशी लक्षणे आढळली होती.
- विषाणूंचा संसर्ग प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना कमी होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र, विषाणूचा संसर्ग झालेल्या काही मुलांवर उपचार करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता
चीन बनवत असलेली कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही त्या देशाच्या सरकारने ही लस चीनमधील हजारो नागरिकांना टोचली आहे. त्याबद्दल काही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आपण विकसित करीत असलेली कोरोनाव्हॅक ही लस सुरक्षित असल्याचा दावा सिनोव्हॅक कंपनीने या महिन्याच्या प्रारंभी केला होता. ही लस टोचल्यानंतर वृद्ध व्यक्तींमध्येही अँटीबॉडीज तयार होतात, असा दावा सिनोव्हॅकने केला होता.
सिनोव्हॅक कंपनीच्या लसीच्या चाचण्या याआधी ब्राझील, इंडोनेशिया, तुर्कस्थान या देशांमध्ये करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कंपनीतील 90% कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना ही लस याआधीच टोचण्यात आली आहे.
सिनोव्हॅकच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची लस टोचल्यानंतर प्रौढ व्यक्तींवर त्याचा काय परिणाम झाला, याबद्दलच्या प्रयोगांचे निष्कर्ष आमच्या हाती आहेत. आता मुलांवरही या लसीच्या चाचण्या करण्यासाठी चीन सरकारने आम्हाला परवानगी दिली आहे.