सीरियन स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू जप्त होणार
By admin | Published: January 27, 2016 05:35 PM2016-01-27T17:35:24+5:302016-01-27T17:35:24+5:30
सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे
Next
>डेन्मार्कचा वादग्रस्त कायदा: जगभरातून टीका
कोपनहेगन: देश सोडून वर्ष होत आले तरी सीरियन स्थलांतरितांच्या हाल- अपेष्टांमध्ये कोणतीही घट होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे. यानुसार स्थलांतरितांकडून दहा हजार क्रोनरपेक्षा (१३४० युरो, १००० पौंड) जास्त असणारी संपत्ती पोलिसांना ताब्यात घेता येणार आहे.
गेल्या वर्षात डेन्मार्कमध्ये २१,००० स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थलांतरितांच्या लोंढ्याचा अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम रोखण्यासाठी डेन्मार्कने हे पाऊल उचलले आहे. डेन्मार्कच्या संसदेत ८१ विरुद्ध २७ अशा मतांनी यास मंजूरी मिळाली. या कायद्यानुसार लग्नाची, साखरपुड्याची अंगठी, चित्रे, सजावटीच्या वस्तू, बक्षीस-पदके स्थलांतरितांना आपल्या जवळ बाळगता येणार आहेत. मात्र घड्याळ, मोबाइल, कॉम्प्यूटर्स जप्त केले जाऊ शकतात. स्थलांतरिताचा आमच्या देशावर येणारा ताण भरुन काढण्यासाठी हे पाऊल उचलावे लागत असल्याचे डेन्मार्कने म्हटले आहे. डेन्मार्क संसदेच्या या कृतीवर जगभरातून टीका होत असून युनोचे सरचिटणीस बान की मून यांनीही डेन्मार्कचा निषेध केला आहे. काही टीकाकारांनी या कायद्याची दुस-या महायुद्धा युरोपात ज्यू लोकांवर ओढावलेल्या परिस्थितीशी केली आहे. डेन्मार्कवर आता टीका होत असली तरी असे करणारा तो पहिला देश नाही. स्वित्झर्लंडने याआधीच स्थलांतरितांकडून पैसे काढून घेतलेले आहेत. ११२ स्थलांतरितांकडून २,१०,००० स्वीस फ्रँक्स त्यांनी गोळा केलेले आहेत तर नेदरलँडसने प्रतीव्यक्ती ५,८९५ युरो व प्रती कुटुंब ११,७९० युरो खर्चापोटी वसूल केलेले आहेत.
जर्मनी देणार रोजगार
सीरियन स्थलांतरित गेल्या दोन वर्षात सर्वाधीक संख्येने जर्मनीमध्ये पोहोचले आहेत. त्यांना तात्पुरते रोजगार देण्याची सोय जर्मनीने केली आहे. यानुसार मध्यपूर्वेत अडकलेल्या सीरियन तसेच जॉर्डनच्या नागरिकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहेत पाच लाख रोजगारांसाठी २०० दशलक्ष युरोंची तरतूद जर्मनी करणार असून प्रतीमहिना ३०० युरो प्रत्येकास मिळतील अशी योजना यामध्ये करण्यात येत आहे.