लाकडाच्या भुशावरही चालणार वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:48 PM2018-09-25T17:48:33+5:302018-09-25T17:49:09+5:30
इंधनाचे दर गगनाला भिडले असताना संशोधकांनी विविध वस्तूंपासून इंधन बनविण्याचे शोध लावले आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी चक्क लाकडाच्या भुशापासून इंधन बनविले आहे.
लंडन : इंधनाचे दर गगनाला भिडले असताना संशोधकांनी विविध वस्तूंपासून इंधन बनविण्याचे शोध लावले आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी चक्क लाकडाच्या भुशापासून इंधन बनविले आहे. यामुळे गॅस संयंत्रांना हरित इंधन बनविण्यासाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे. बेल्जिअमच्या लुवेनयेथील कॅथॉलिक विद्यापीठाच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे.
भारतासह अमेरिका, ऑफ्रिकेमध्ये झाडांची बेसुमार तोड होत आहे. यावेळी लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनविताना निघणाऱ्या भुशाचा वापर जळणासाठी केला जातो. या भुशातील सेल्युलोज आणि हायड्रोकार्बनपासून इंधन निर्माण करण्याची पद्धत या संशोधकांनी शोधून काढली आहे. या हायड्रोकार्बनना गॅसोलिनमध्ये मिसळून इंधनाच्या स्वरुपात वापर केला जाऊ शकतो. सेल्युलोज मिश्रित गॅसोलीन हे दुसऱ्या पीढीचे जैवइंधन असणार आहे.
विद्यापीठातील प्रोफेसर सेल्स यांनी सांगितले की, झाडांच्या अवशेषापासून इंधन बनविण्यासाठी एक रासायनिक प्रक्रिया केली जाते. या पद्धतीने बनविलेल्या जैव इंधनाची गुणवत्ता एवढी चांगली असते की सेल्यूलोजपासून बनलेली आणि नैसर्गिक इंधनामधील फरक ओळखण्यासाठी कार्बन डेटिंगची प्रक्रिया करावी लागते.