दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; ‘क्लाउड सीडिंग’ने केला घात; दीड वर्षाचा पाऊस एका दिवसात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:15 AM2024-04-18T05:15:41+5:302024-04-18T05:15:50+5:30
वाळवंटी दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात; लोक झोपले विमानतळावर
दुबई : वाळवंटी देश संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मंगळवारी विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वाहने पाण्याखाली बुडल्याने लोकांना मोठा फटका बसला. दुबई विमानतळावर अतिवृष्टी, पुरामुळे उड्डाणांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
सोमवारी रात्री उशिरा पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती होती. अनेक गाड्या पाण्यामध्ये तरंगत होत्या. यानंतर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास जोरदार वादळ आले. यासोबतीला मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. एका जोडप्याने सांगितले की, विमानतळावरील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तुम्हाला टॅक्सी मिळू शकत नाही. अनेक लोक मेट्रो स्टेशनवर झोपले आहेत. तर अनेक लोक विमानतळावर झोपले आहेत.
१९४९ पासून प्रथमच असे घडले...
मंगळवारचा पाऊस ही एक ऐतिहासिक हवामान घटना होती, इतका पाऊस १९४९ मध्ये डेटा संकलन सुरू झाल्यापासून सर्वाधिक नोंदवला गेला आहे.
बहारीन, ओमान, कतार आणि सौदीतही पाऊस पडला. मात्र, सर्वाधिक पाऊस हा यूएईमध्ये झाला.
असे का झाले?
- कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात सरकारने छोटी विमाने तैनात केली होती. त्यामुळे ‘क्लाउड सीडिंग’ झाल्याने मुसळधार पाऊस पडल्याचे सांगण्यात आले.
- शास्त्रज्ञांनी सांगितले की, पावसापूर्वी सहा किंवा सात ‘क्लाउड सीडिंग’ उड्डाणे घेण्यात आली होती. यामुळेच मुसळधार पाऊस पडल्याची शक्यता आहे. यूएईमध्ये कमी होत जाणारे, भूजल भरून काढण्यासाठी ‘क्लाउड सीडिंग’चा वापर
करण्यात येतो.
पाकमध्ये कहर, ६३ जणांचा मृत्यू
पेशावर : पाकिस्तानमध्ये वीज पडून आणि मुसळधार पावसामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अत्यंत खराब हवामानामुळे किमान ६३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याचे अधिकारी झहीर अहमद बाबर यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पाकमध्ये एप्रिलमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे.