१३,०००% चलनवाढ, एक कप कॉफीसाठी द्यावा लागतो संपूर्ण महिन्याचा पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 08:25 PM2018-05-05T20:25:38+5:302018-05-05T20:25:38+5:30
व्हेनेझुएलाची आताची पिढी ज्या महागाई आणि चलनवाढीला सहन करत आहे तशी परिस्थिती कोणीच पाहिली नसेल.
कॅराकस- काय ही महागाई, आमच्यावेळेस दहा रुपयात सगळ्या वस्तू यायच्या, आता सगळं महाग झालंय असं म्हणणारे लोक आपल्याकडे प्रत्येक पिढीत दिसतात. पण व्हेनेझुएलाची आताची पिढी ज्या महागाई आणि चलनवाढीला सहन करत आहे तशी परिस्थिती कोणीच पाहिली नसेल. एक कपभर कॉफी किंवा पावाची लादी घेण्यासाठी इथल्या लोकांवर एका महिन्याचा पगार खर्च करावा लागत आहे. काहा लोकांनी तर पाव विकत घेण्यासाठीही क्रेडिट कार्डाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्हेनेझुएलाच्या चलनवाढीचा दर १३,००० % होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांच्या समाजवादी सरकारच्या काळामध्ये जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल १०० च्या वर गेले होते त्यामुळे तेलउत्पादक व्हेनेझुएलाला चांगलेच उत्पन्न मिळाले. मात्र २०१४ पासून तेलाचे दर कोसळले. त्यानंतर देशाला उभ्या करणाऱ्या एकाधिकारशहा चावेज यांचे निधन झाले. आधीच कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेची स्थिती निर्नायकी झाली. चावेज यांचे वारस निकोलस मडुरो प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याने देशाची स्थिती अधिकच बिघडली, राजकीय अस्थिरताही निर्माण झाली. गेल्या चार वर्षांमध्ये व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेने मान वर काढलीच नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने लोकांवर उपाशी राहाण्याची वेळ आलीच व चलनवाढीमुळे असंतोषही निर्माण झाला. अर्जेंटिनामध्ये २०१६ साली चलनवाढीचा दर ४७% वर गेला होता मात्र तेथिल परिस्थिती आता सुधारत आहे.
चलनवाढीत व्हेनेझुएलानंतर दक्षिण सुदानचा नंबर लागतो तेथे ४७६.०२ चलनवाढ आहे. त्यानंतर सुरिनाम ६७.११% , अंगोला ३३.६८%, मालावी १९.७८% यांचा नंबर लागतो..