व्हेनेझुएलाने चलनात आणल्या नव्या नोटा
By Admin | Published: January 18, 2017 01:04 AM2017-01-18T01:04:56+5:302017-01-18T01:04:56+5:30
गगनाला भिडलेल्या चलन फुगवट्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाने नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.
काराकस : गगनाला भिडलेल्या चलन फुगवट्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाने नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. नव्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा एटीएम आणि बँकांसमोर दिसून येत आहेत.
भारताच्या पावलावर पाऊल ठेवून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी गेल्या महिन्यात १00 बोलिव्हरची नोट चलनातून रद्द केली होती. त्याजागी ५00 आणि २0 हजार बोलिव्हरच्या नोटा आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नव्या नोटा चलनात आण्यात आल्या आहेत. आकड्यामागे अनेक शून्य असलेल्या नोटा पाहून नागरिक हैराण झाले आहेत. व्हेनेझुएलातील महागाईचा दर तीन अंकी आहे. विदेशी चलन साठा कमालीचा घसरला आहे. त्यामुळे खाद्य वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. मोठ्या रकमेच्या नोटा व्हेनेझुएलाला फार काळ दिलासा देतील, असे जाणकारांना वाटत
नाही. (वृत्तसंस्था)