व्हेनेझुएलाचं कंबरडं का मोडलं? हजारो नागरिकांनी सोडला देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:18 PM2018-08-27T15:18:53+5:302018-08-27T15:32:49+5:30
गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. आता कचऱ्यामध्ये अन्न शोधून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कॅराकस- तेलाचे प्रचंड साठे असणारा व्हेनेझुएला देशाची अर्थव्यवस्था एकेकाळी अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये होती मात्र आता संकटात सापडलेल्या या देशाची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. १ व्या शतकाच्या पहिल्या दशकात जगातील सर्व भांडवलशाही अर्थव्यवस्थांना तोडीस तोड उत्तर देत या देशाने आपली अर्थव्यवस्था बळकट केली होती. मात्र आज या देशातील लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नाहीत. बेसुमार चलनवाढीमुळे साधा ब्रेड किंवा अंडे विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. आता कचऱ्यामध्ये अन्न शोधून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जिवंत राहाण्यासाठी व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी शेजारच्या देशांची वाट धरली आहे. या स्थलांतरामुळे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
व्हेनेझुएलाचा नक्की प्रश्न काय आहे?
बेसुमार चलनवाढ हा व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला आम्हाला ऐकून आश्चर्च वाटेल पण व्हेनेझुएलामध्ये सध्या चलवाढीचा दर 10 लाख टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. यापुर्वी झिम्बाब्वेने 2000 टक्क्यांचा टप्पा गाठला होता. तर 1920मध्ये जर्मनीमध्येही चलनवाढ जाली होती. मात्र हे सर्व रेकॉर्ड मोडत व्हेनेझुएलामध्ये बेसुमार चलनवाढ झाली आहे. तेलाचे दर कोसळल्यामुळे अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली आहेच. इतके होऊनही व्हेनेझुएलाच्या सरकारने या चलनवाढीमागे अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि विरोधकांचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
2014 साली तेलाचे दर कोसळल्यानंतर काय झाले?
१९९९ साली ह्युगो चावेज व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आले.तेव्हा जगातील सर्वात जास्त तेल साठा असणाऱ्या म्हणजे व्हेनेझुएलाच्या अर्थकारणाची दिशा ठरवण्याची संधी मिळाली. समाजवादी विचारांच्या चावेज यांनी सर्व अर्थव्यवस्था तेलावर आधारीत यार करायला घेतली. मिळालेल्या प्रत्येक पैशाचा उपयोग गरिबांसाठी करु अशा घोषणा त्यांनी केल्या. गरिबांना तशी मदत केलीही. अन्न, औषधे या सगळ्यावर सबसिडी दिली, शिष्यवृत्त्या दिल्या, जमिन सुधारणा कायदे केले. तेलामुळे आपला देश चालतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी उद्योगांचे सरकारीकरण करायला घेतले. देशातील खासगी उद्योगांचे पूर्ण कंबरडे मोडून झाल्यावर तेलाच्या पैशावर सर्व वस्तू आयात करणे सुरु केले. पण तेलाच्या किंमती अस्थिर असतात, त्या कधीही बदलू शकतात याची त्यांनी कधीच काळजी केली नाही. सत्तेत राहाण्यासाठी लोकप्रिय योजना तोटा सहन करुन सुरुच ठेवल्या. मात्र २०१३ साली चावेज यांचे कॅन्सरने निधन झाले. चावेज यांचे निधन झाल्यावर १०० डॉलरच्या वर गेलेले तेलाचे भाव पुढच्याच वर्षी कोसळले. इथेच व्हेनेझुएलाच्या संकटांना सुरुवात झाली. चावेज यांचा मृत्यू आणि तेलाच्या दराची घसरण अशी दोन संकटे या देशावर आली
अन्न आणि औषधांचा तुटवडा
व्हेनेझुएलाची आयात करण्याची क्षमता अगदीच कमी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 50 टक्के इतकीच आयात करता आली आहे. व्हेनेझुलातील मासिक वेतन केवळ 1 डॉलर इतके घसरले आहे. त्यामुळे अगदी साध्या गरजा भागवणेही लोकांना अशक्य झाले आहे. प्रत्येक 26 दिवसांनंतर किंमती दुप्पट होतात त्यामुळे लोकांना कचऱ्याच्या डब्यांमध्ये अन्न शोधावे लागत आहेत.
नवे चलन
व्हेनेझुएलाने या सर्व गोंधळातच नवे चलन बाजारात आणायचे निश्चित केले. सध्या कोसळलेल्या बोलिवार या चलनामधील शेवटचे तीन शून्य काढून टाकण्याचा निर्णय निकोलस मडुरो यांनी घेतला होता. मात्र आता पाच शून्ये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे केल्यामुळे चलनवाढीशी लढा थोडा सोपा होईल असे मडुरो यांना वाटते. पुढील महिन्यामध्ये हे 'बोलीवार सोबेरानो' नवे चलन जुन्या 1 लाख बोलिवारच्या तोडीचे असेल.
स्थलांतरितांचे लोंढे
सध्या 23 लाख व्हेनेझुएलन नागरिक देशाच्या बाहेर राहात आहेत. त्यातील 16 लाख लोक 2015साली अर्थव्यवस्था घसरल्यापासून बाहेर पडलेले आहेत. या नागरिकांनी कोलंबिया, इक्वेडोर, पेरु आणि चिलीमध्ये आसरा घेतला आहे तर काही लोक ब्राझीलच्या दिशेने गेले आहेत. यास्थलांतराचा सर्वाधीक फटका कोलंबियाला बसला आहे. कोलंबियामध्ये 8 लाख 70 हजार तर 4 लाख व्हेनेझुएलन नागरिक पेरुमध्ये आहेत. पेरुमध्ये या महिन्यात एका दिवसात 5100 स्थलांतरितांनी प्रवेश केला. या गतीने स्थलांतरित आले तर आमची अर्थव्यवस्थाही कोसळेल अशी भीती या देशांनी व्यक्त केली आहे.
Venezuela's central bank created an app to help people make sense of the country's re-denominated currency https://t.co/WVCLgI7YPvpic.twitter.com/iB8ddD9Thm
— TicToc by Bloomberg (@tictoc) August 27, 2018
गुन्ह्यांचे वाढले प्रमाण
व्हेनेझुएलामध्ये गरिबी आणि बेरोजगारीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षात 27 हजार लोकांची अत्यंत हिंसक हत्या करण्यात आली आहे. श्रीमंत नागरिकांना हल्ल्याच्या भीतीमुळे अधिक काळजी घ्यावी लागत आहे.
Desperate mothers are fleeing Venezuela with young babies and toddlers to find better lives https://t.co/uu6SESg5xf
— Sky News (@SkyNews) August 27, 2018