अतिशय यशस्वी मोहीम - ट्रम्प
By Admin | Published: April 14, 2017 05:41 AM2017-04-14T05:41:47+5:302017-04-14T05:41:47+5:30
अफगाणच्या इसिसबहुल भागावर हा बॉम्ब टाकण्याचे सर्वाधिकार मीच लष्कराला बहाल केले होते, असे सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अतिशय
वॉशिंग्टन : अफगाणच्या इसिसबहुल भागावर हा बॉम्ब टाकण्याचे सर्वाधिकार मीच लष्कराला बहाल केले होते, असे सांगून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अतिशय यशस्वी मोहीम ठरली असल्याचा दावा केला आहे.
या कामगिरीबद्दल मला माझ्या सैनिकांचा खरोखरच अभिमान आहे. प्रत्येकाला माहीत आहे की काय झाले आहे. जगातील सर्वांत श्रेष्ठ लष्कर आमच्याकडे आहे आणि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मी त्यांना सर्वाधिकार बहाल केले होते. मोकळेपणाने सांगायचे तर हे काम आम्ही खूप आधीच करायला पाहिजे होते. तुम्ही मागील आठ आठवड्यांत काय घडले, हे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, हे मागील आठ वर्षांतच घडायला पाहिजे होते. आता तुम्हाला आमूलाग्र बदल दिसेल. यातून उत्तर कोरियाने काय संदेश घेतला असेल ते मला माहीत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
अमेरिकन लष्कर (अफगाण)चे कमांडर जनरल जॉन डब्ल्यू. निकोलसन यांनी सांगितले की, इसिस त्यांच्या बचावासाठी आयईडी, बंकर्स, गुहा वापरत होती. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.
ननगरहार हा इसिसचा गड मानला जातो. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात इसिसचे सुमारे ६००-८०० अतिरेकी वास्तव्य करतात. नेमक्या याच भागावर महाबॉम्ब टाकण्यात आला.