चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे बळी ८१३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 06:27 AM2020-02-10T06:27:32+5:302020-02-10T06:27:49+5:30
चीनमध्ये शनिवारी ८९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले २,६५६ नवे रुग्ण आढळून आले.
बिजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संसर्गाने बळी घेतलेल्यांची संख्या आता ८१३ झाली आहे. २००२-०३ साली सार्स विषाणूच्या संसर्गाने घेतलेल्या बळींपेक्षा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जास्त झाला आहे. कोरोनाची लागण जगातील २५ देशांमध्ये झाली आहे.
चीनमध्ये शनिवारी ८९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले २,६५६ नवे रुग्ण आढळून आले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, चीनमधील ३१ प्रांतांमध्ये ३७,१९८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. २००२-०३ साली सार्स विषाणूच्या संसर्गाने चीन, हाँगकाँग व अन्य प्रदेशांत एकूण ७७४ जणांचे बळी घेतले होते. त्यापेक्षा अधिक लोक कोरोनाच्या साथीमध्ये मरण पावले आहेत. चीनमधील हुबेई प्रांतात ८१, हेनानमध्ये २, हेबेई, हेलाँगजिआंग, शॅडाँग, अनहुई, हुनान, ग्वांगक्षी-झुआंग या प्रांतांमध्ये प्रत्येकी एक जण शनिवारी मरण पावला. हुबेई प्रांतातील ३२४सह सुमारे ६०० लोकांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी शनिवारी देण्यात आली.
चीनमध्ये कोरोनाग्रस्त ६,१८८ जणांची प्रकृती चिंताजनक असून, उपचारांनंतर २,६४९ जणांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. मकाव व तैवानमधील प्रत्येकी एक रुग्ण उपचारांनंतर बरा झाला.
ओदिशामधील रुग्ण कोरोनाग्रस्त नाही
ओदिशामध्ये एका संशयित रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी शनिवारी डॉक्टरांनी दिली.
चीनच्या शिष्टमंडळाची गोवा भेट स्थगित
पणजी : चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने तेथील शिष्टमंडळाने गोवा भेट स्थगित केली. पर्यटनविषयक देवाण-घेवाण व तत्सम विषयांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रविवारी गोव्यात येणार होते. गोव्यात पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी)चे अध्यक्ष सावियो मेशियस यांनी सांगितले की, शिष्टमंडळाची ही भेट स्थगित केली आहे.