व्हिडिओ - सिंहाचा चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न, काचेने वाचवलं
By admin | Published: June 6, 2016 12:23 PM2016-06-06T12:23:43+5:302016-06-06T12:51:25+5:30
टोकियोमधील छिबा प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंज-याबाहेर उभ्या असलेल्या चिमुरड्यावर सिंहाने एकदम उडी मारुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला
Next
>ऑनलाइन लोकमत -
टोकियो, दि. 06 - अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयात 4 वर्षाच्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी गोरिलाला ठार मारावं लागलेली घटना ताजी असताना पुन्हा एकदा प्राण्याने चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. टोकियोमधील छिबा प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंज-याबाहेर उभ्या असलेल्या 2 वर्षाच्या चिमुरड्यावर सिंहाने एकदम उडी मारुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेली काच आडवी आल्याने चिमुरड्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
सिंहाने चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सिंहाच्या पिंज-याबाहेर उभा राहून चिमुरडा कौतुकाने त्याच्याकडे पाहत होता. मात्र त्याचं लक्ष नसलेलं पाहून सिंहाने झेप घेतली आणि चिमुरड्यावर पंजा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेसाठी लावण्यात आलेली काच आडवी आली, आणि सिंहाची फजिती झाली. काचेवर सिंह जोरदार आपटल्यानंतर चिमुरडा थोडासा घाबरला, मात्र त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.
सिंह जेव्हा कधी लहान मुलांना पाहतो तेव्हा अशाच प्रकारे वागतो अशी माहिती प्राणीसंग्रहालयातील कर्मचा-यांनी दिलेली आहे.