... म्हणून कोरोना होण्यासाठी ती मारतेय लोकांना मिठ्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:15 AM2022-01-25T06:15:42+5:302022-01-25T06:16:14+5:30
आपल्या लग्नात कोरोनानं विघ्न आणू नये आणि आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या ‘बिग डे’वर पाणी पडू नये यासाठी लग्नाआधीच आपल्याला कोरोना होऊन जावा, अशी तिची इच्छा आहे
तिचं नाव मॅडी स्मार्ट. ही तरुणी ऑस्ट्रेलियामध्ये राहते. लोकांना मिठ्या मारण्याच्या तिच्या ताज्या वेडाविषयीची ही कहाणी. दोन वर्षं झाली; कोरोनाच्या नावानं सारे बोटं मोडताहेत. हा कोरोना एकदाचा संपावा म्हणून सगळे जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. जगातील कोट्यवधी लोकांनी कोरोना टाळण्यासाठी लस घेतली असली, तरी अजूनही कोट्यवधी लोकांनी लस घेतलेली नाही. कारण, ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काही लोक लस घेण्यास साफ नकार देत आहेत. टेनिसपटू नोवाक जोकोविच हा या लसविरोधकांमधलाच! पण, त्यांनी लस घेतली नाही; म्हणजे आपल्याला कोरोना व्हावा ही काही त्यांची इच्छा नाही.. ऑस्ट्रेलियातील एक तरुणी मात्र आपल्याला कोरोना व्हावा म्हणून जंग जंग पछाडते आहे.
पुढच्या महिन्यात तिचं लग्न आहे. तरीही आपल्याला कोरोना व्हावा, यासाठी ती जगावेगळे उपद्व्याप करते आहे. कोरोना झाला तर आपलं लग्न लांबणीवर पडेल या हेतूनं नव्हे, तर लग्न इतकं जवळ आलं तरीही आपल्याला कोरोनाची लागण कशी झाली नाही, म्हणून ती चिंतित आहे.
आपल्या लग्नात कोरोनानं विघ्न आणू नये आणि आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या ‘बिग डे’वर पाणी पडू नये यासाठी लग्नाआधीच आपल्याला कोरोना होऊन जावा, अशी तिची इच्छा आहे. आताच कोरोना होऊन गेला म्हणजे लग्नाच्या तारखेपर्यंत आपल्याला पुन्हा इन्फेक्शन होणार नाही आणि थाटात लग्न साजरं करता येईल हा तिचा होरा. त्यासाठी मॅडीनं काय (काय) करावं? डान्स क्लबमध्ये जाऊन तिथे येणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला ती मुद्दाम मिठ्या मारते आहे. दुसऱ्यांचे ‘उष्टे’ पेयाचे ग्लास पिते आहे, आपला ग्लास इतरांना देऊन पुन्हा तो तोंडाला लावते आहे, उष्टे खाद्यपदार्थ खाते आहे, शेअर करते आहे.. हे केल्यामुळे तरी आपल्याला लवकरात लवकर कोरोना गाठेल ही तिची मनीषा. लग्नाच्या दिवशी कोरोनानं कोणताही ‘घातपात’ करू नये, त्याला जे काही करायचं असेल, ते आताच करावं यासाठी ती लोकांना मिठ्या मारत सुटली आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ तिनं स्वत: नुकताच शेअर केला आहे. मेलबर्न येथील एका क्लबमधील लोकांना मिठ्या मारताना आणि त्यांचे उष्टे ग्लास तोंडाला लावताना ती दिसते आहे. या व्हिडिओला तिनं कॅप्शनही दिली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे, ‘कॅच कोविड, नॉट फिलिंग्ज!’
कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्याची वाट लागली, त्यांनी केलेले सारे प्लॅन्स फिसकटले, कोणाला आपला वाढदिवस थाटात साजरा करायचा होता, कोणाला आपल्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती, थाटात सोहळा करायचा होता. पण, कोरोनानं सगळ्यांचंच मुसळ केरात घातलं. अनेक प्लॅन एकतर पुढे ढकलावे लागले; नाहीतर, कायमचे रद्द करावे लागले. शाळा बंद झाल्या, परीक्षा लांबणीवर गेल्या, मोठमोठ्या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या; इतकंच काय, ऑलिम्पिकलाही त्याचा फटका बसला.. पण, मॅडी स्मार्ट स्वत:हून कोरोनाला मिठीत घेते आहे. मॅडीच्या व्हिडिओला सोशल मीडियावरही प्रचंड प्रतिसाद मिळाला. ज्या दिवशी तिनं हा व्हिडिओ पोस्ट केला, त्याच दिवशी सुमारे सव्वा लाख लोकांनी तो पाहिला. आपल्या व्हिडिओवर संपूर्ण देशात आणि जगभरात एवढी चर्चा होते आहे हे पाहून दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर तिनं हा व्हिडिओ ‘प्रायव्हेट’ करून टाकला आणि ‘भूमिगत’ झाली. का केलं तिनं असं? - कारण तिच्या या कृत्यामुळे अनेकांनी तिला वेड्यातच काढलं नाही, तर असभ्य, अश्लील आणि मूर्खपणाचं कृत्य म्हटलं. जीवाचं रान करून लोकांना वाचवण्याचा, त्यांना कोरोनापासून दूर राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा अपमान आहे, अशी टीकाही अनेकांनी केली.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन आणि इतर अनेक कठोर उपायांनी ऑस्ट्रेलियानं कोरोनाला बऱ्यापैकी जखडून ठेवलं असलं, तरी आता मात्र ऑस्ट्रेलियात वेगानं कोरोना वाढतो आहे. गेल्याच आठवड्यात एकाच दिवशी आजपर्यंतची सर्वाधिक तब्बल दोन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतं आहे. क्लब्ज, डान्स बार बंद करण्यात आले आहेत, लोकांवरील निर्बंध वाढवले आहेत. तरीही आधी कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनाही पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या या नव्या लाटेत ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांत तब्बल १५ लाख लोक बाधित झाले आहेत. त्यातील निम्मे तर केवळ एका आठवड्याच्या आत बाधित झालेले आहेत. अशावेळी स्वत:ला ‘स्मार्ट’ समजणाऱ्या मॅडीसारख्या लोकांनी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.
दुधात मिठाचा खडा कसा चालेल?
मॅडीनं ज्या दिवशी आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियन सरकारनं डान्स बार्स, क्लब्जवर काही काळापुरती बंदी घातली. मॅडीच्या कृत्यानं तिच्यावर सर्वदूर टीका होत असली, तरी ती म्हणते, “लग्न केवळ काही आठवड्यांवर आलं आहे आणि आपल्याला कधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो या टांगत्या तलवारीची भीती दुधात मिठाचा खडा घालण्यासारखीच आहे..!”