VIDEO- हिंदी गाण्यातून ब्रिटनच्या पंतप्रधानांचं मतदारांना आवाहन
By admin | Published: May 31, 2017 02:41 PM2017-05-31T14:41:35+5:302017-05-31T14:43:54+5:30
ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्युझिक व्हिडिओ बनवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 31- निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक राजकारणी आपापल्या पद्धतीने प्रचार करतो. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे राजकारणी वापरतात. निवडणुकीच्या प्रचारात ब्रिटनसुद्धा आता मागे राहिलं नाही. निवडणुकीचा प्रचार जसा भारतात जोरदार केला जात असतो तसा तो भारताबाहेरही केला जातो याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्युझिक व्हिडिओ बनवला आहे. या २ मिनिटांच्या व्हिडिओत त्यांनी चक्क साडी नेसली आहे. तसंच हिंदी गाणं वापरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
"दोस्तो, धन्यवाद शुक्रिया मेहरबानी. अब फिर समय आया है साथ निभाने का, पिछले समय जो साथ निभाया उसका भी सलाम।", असे या गाण्याचे बोल आहेत. व्हिडिओत थेरेसा मे अनवाणी चालताना आणि साडी नेसून मंदिरात पूजा करताना दिसून येत आहे. "थेरेसा के साथ" असं या व्हि़डिओचं नाव आहे.
व्हिडिओच्या सुरुवात ब्रिटीश संसदेची एक झलक बघायला मिळते आहे, त्यानंतर येत्या ८ जून रोजी असलेल्या निवडणुकीबद्दल या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. भारत दौऱ्यावर टेरेसा मे आल्या होत्या तेव्हाचे भारतीय नेत्यांसोबतचे फोटो या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत. थेरेसा आणि त्यांचा पक्ष - कॉन्झर्वेटिव पार्टी भारतीय मतदारांच्या बाजूने आहे, थेरेसा यांचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, हे या व्हिडिओतून दाखविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओत थेरेसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीचेही फोटो दाखवण्यात आले आहेत.